अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका विवाहित ३५ वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केला तसेच तिची ३३ लाखांची फसवणूक केली. युवकाला याप्रकरणी मध्यप्रदेशातील एका महिलेने मदत केली. ही धक्कादायक घटना साईनगर येथे १५ जानेवारी २०१५ ते २१ जानेवारी २०२१ दरम्यान घडली.
याप्रकरणी पोलिसांनी युवतीच्या तक्रारीवरून आरोपी सिघात नामदेवराव अघाव (४२, रा. मात्रछाया रेसिडेंसी, ४४ वी माळ, पाईप लाईन रोड, अहमदनगर) तसेच मध्य प्रदेशातील चित्रा नामक एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.
पोलीस सूत्रांनुसार, आरोपी सिघात हासुद्धा विवाहित असून, त्याची सोशल मीडियावरून पीडितेशी ओळख झाली. आरोपीने युवतीला धार्मीक स्थळी नेण्याच्या बहाण्याने मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूरला नेले. तेथे व वेगवेगळ्या ठिकाणी लग्नाचे आमिष देऊन तिच्याशी शारिरीक संबध प्रस्थापित केले. सदर गुन्हा हा आरोपी महिलेच्या संगनमताने घडवून आला. म्हणून पोलिसांनी तिलाही आरोपी केले आहे. सिघात हा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने वेळोवेळी २६ लाख ५० हजार नगदी तसेच सहा लाखांचे सोने घेऊन पीडिताची फसवणूक केली. तिचे बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड तयार करून त्याचा वापर केला. घटनेबाबत कुणालही सांगायचे नाही, असे धमकावून मारहाण केली. संभाषणाची व्हिडीओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकाराला कंटाळून अखेर युवतीचे पोलिसांत धाव घेतली. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३२३,३७६(२),(एन),४१७,४२०,४६८,४७१,३४ अन्वेय गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत.