नरेंद्र जावरे परतवाडा : अचलपूर शहरातील जगदंबा चौक ते रासेगाव मार्गावर निघणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर मातीचे तीन फुटांचे ढिगारे आल्याने सर्वत्र चिखल झाला आहे. या निसरड्या रस्त्यावर अनेकांना अपघात झाला. २० गावांना जोडणारा रस्ता चार दिवसांपासून बंद आहे. संबंधित शेतकऱ्याच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असून, अचलपूर नगरपालिकेने यासंबंधी नोटीस बजावली आहे.
परतवाडा-अचलपूर शहरातील गांधी पूल, जगदंब मंदिर व सरमसपुरा पोलीस ठाणे, रासेगाव व परिसरातील २० गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर पोलीस ठाण्यानजीक उंच भागावर शेती असलेल्या शेतकऱ्याने सपाटीकरण करून कडेला लावलेल्या ढिगातील माती पाण्यामुळे रस्त्यावर आली. परिणामी हा मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. चार दिवसांपूर्वी अचलपूर नगरपालिकेच्या सहायक रचनाकार मृणालिनी पाटील व संबंधित अभियंता यांनी पाहणी केली असता, हा गंभीर प्रकार उघडकीस आला.
बॉक्स
अनेकांना अपघात, पोलीस मदतीला
पावसामुळे रस्ता चिखलमय झाला होता. त्यामुळे अनेकांना येथे अपघात झाला. त्यांना सरमसपुरा पोलीस ठाण्यातील कर्मचारी व ठाणेदार जमील शेख यांनी उचलून मदत केली.
बॉक्स
अचलपूर नगर पालिकेच्यावतीने सहायक नगर रचनाकार मृणालिनी पाटील यांनी विनायक पिंपळकर या संबंधित शेतकऱ्याला नोटीस बजावली. रहदारीचा मार्ग बंद करणे हा गंभीर गुन्हा असून, तेथे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहे. त्यामुळे तात्काळ हा मार्ग मोकळा करून पाण्याची वाट दुसरीकडे काढण्याचे आदेश या नोटीसद्वारे अचलपूर नगरपालिकेने दिले. तसे न केल्यास पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे सुचविणार असल्याचे त्यात नमूद आहे.
कोट
संबंधित शेतकऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे. तत्काळ जेसीबीने रस्ता पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसे न झाल्यास कारवाई करण्यात येईल.
- राजेंद्र फातले, मुख्याधिकारी, नगर परिषद, अचलपूर