अचलपूर : नजीकच्या सावळी दातुरा येथील आदिवासी युवतीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांना तिसऱ्या दिवशीही काहीच धागेदोरे गवसले नाहीत. आज रविवारी दुपारी १ वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या.या प्रकरणातील अज्ञात आरोपींचे स्केच पोलिसांनी जारी केले आहे. परतवाडा-अकोला मार्गावरील सावळा-दातूरा येथील विजय प्रजापती यांच्या शेतात गुरुवारी २८ आॅगस्ट रोजी दोन अज्ञात नराधमांनी रखवालदार आदिवासीला गंभीर मारहाण करुन झोपडीत डांबले होते. तसेच त्यांच्या १९ वर्षीय मुलीवर रात्रभर आळीपाळीने अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस येताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणात अज्ञात नराधमांनी मुलीच्या वडिलांना कोयत्या व कुऱ्हाडीने डोक्यावर, पायावर, कानावर मारहाण करुन गंभीर जखमी केले होते. वडिलासह तिला ठार मारण्याची धमकी युवतीला दिली होती. भेदारलेल्या युवतीने रात्रभर अत्याचार सहन करीत गुरुवारी पहाटे सदर प्रकार शेतमालकास सांगितला. त्यांनी तिला परतवाडा पोलिसात नेऊन घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. पोलिसांनीही घटनेला गांभीर्याने घेत तपासाला गती दिली. आरोपी अज्ञात असल्याने परिसरातील सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. परंतु ठोस पुरावे मिळाले नाहीत.
तिसऱ्या दिवशीही सुगावा नाही, आरोपींचे स्केच तयार
By admin | Updated: August 31, 2014 23:29 IST