पशुपालक हैराण : उदरनिर्वाहाचा प्रश्न, चोरट्यांना शोधण्याचे आव्हान सुनील देशपांडे अचलपूरपाळण्यासाठी कुठलाही खर्च नसून मानवाच्या उपयोगी गाढव पडत असते. ते मुकाटपणे काम करते म्हणूनच मूर्ख माणसाला गाढव म्हटले जात असावे. अशा या गाढवांवर मागील काही दिवसांपासून जुळ्या शहरावर वक्रदृष्टी झाली आहे. गाढवांची संख्या कमी होत आहे. गाढवांच्या चोरीमुळे त्यांच्या भरवशावर संसाराचा गाडा ओढणाऱ्या गोरगरीबांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. मौल्यवान वस्तू, पैसा किंवा महागडे कुठलेही साहित्य, दुचाकी, चारचाकी वाहन चोरीला जात असल्याच्या घटना दैनंदिन घडत असतात. पण, अचलपूर-परतवाड्यात गाढवांच्या चोऱ्या होत आहे. अचलपुरातील माळवेशपुरा, भोईपुरा, बेगमपुरा, कासदपुरा, दिलदारपुरा, सरमसपुरा तर परतवाड्यात बिच्छन नदीच्या आसपास दयालघाटलगत छोटा बाजाराच्या मागील भाग आदी परिसरामध्ये गाढवाच्या भरवशावर आपल्या कुटुंबाचा गाडा ओढणारे अनेक जण आहेत. त्यांची निश्चित आकडेवारी कुठल्याही शासकीय कार्यालयात उपलब्ध नसली तरी जुळ्या शहरात जवळपास २०० पेक्षा अधिक गाढवांचे मालक आहेत. गाढवांची संख्या ५ ते ७ हजारांवर आहे.गोरगरीबांकडे गाढव असून त्यावर तो आपली उपजिविका करतो. दिवसभर गाढवाकडून ओझे वाहण्याचे काम करून घेतल्यानंतर अनेक मालक त्यांना रात्री शहरात मोकाट सोडून देतात. रस्त्याने फिरताना जे मिळेल ते खाऊन गाढव आपले पोट भरते. मालकाला काम मिळाल्यावर तो गाढवांना शोधून ओझे वाहण्याचे काम करून घेतो म्हणजे कुठलाही खर्च न करता गाढवाकडून काम करून घेणे बिगर भांडवली धंदा आहे. प्राप्त माहितीनुसार चार-पाच महिन्यांपूर्वी रेतीवाहतूक व उत्खननावर बंदी असताना याच गाढवांच्या पाठीवर रेती लादून आपल्या बांधकामापर्यंत आणून घरे बांधली आहे. या काळात अनेक गाढवांच्या मालकांनी बऱ्यापैकी पैसा मिळवला होता. गोरगरीब समाज हा गाढवांवरून घराच्या पायाभरणीसाठी (प्लीन) लागणारी माती, नदीतील गाळ, दगड-गोटे हे नदीवरून आणून देणे व खोदकामाची माती गावाच्या बाहेर नेऊन टाकणे यावर आपल्या कुटूंबाची उपजिवीका करतो. गेल्या काही महिन्यापूर्वी गाढव चोरीच्या अशाच घटना पंढरपूरला घडल्या होत्या. पोलिसांच्या खबऱ्याने ती माहिती उजेडात आणली होती. त्यात गाढवचोरटे गाढवाचे मांस काही ढाबा संचालकांना विकत असल्याची माहिती समोर आली होती. ते ढाबा चालकही या प्रकारापासून अनभिज्ञ होते. प्राप्त माहितीनुसार चार ते पाच वर्षापूर्वी गाढवचोरीला गेल्याचा तक्रारी काही मालकांनी अचलपूर पोलीस स्टेशनला दिल्या होता. गेल्या चार-पाच वर्षात २०० पेक्षा जास्त गाढव चोरीला गेले आहेत. यामुळे पशुपालक हैराण आहेत. सर्वत्र शोध घेऊनही गाढव दिसले नाहीकाही दिवसांपासून आमचे एक-एक गाढव बेपत्ता झाले. त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही ते दिसत नसल्याने एखाद्या सरपटणारा प्राणी चावून मेले असावे असे वाटले. पण बऱ्याच जणांचे गाढव चोरीला जात असल्याचे समजल्याने आमचा संशय बळावला असून आमचेही गाढव चोरी झाले असावे, असे मत कासदपुऱ्यातील ज्ञानेश्वर धारपवार, रवि धारपवार, सराईपुऱ्यातील राजेंद्र सुरजुसे, जितु मेसरे यांनी व्यक्त केले. आम्हाला माहिती मिळाली की तहसील कार्यालयाजवळील पटांगणातून एका विना नंबरच्या ४०७ मिनी ट्रकमध्ये काही लोकांच्या मदतीने २० ते २५ गाढव भरून नेण्यात आले. गाढवांची संख्या कमी होत आहे. - बाळू धारपवार, गाढवांचे मालक.गाढव मालकीचा लेखी पुरावा किंवा दस्ताऐवज नसले तरी फक्त मालकाने सांगितलेल्या वर्णनावरुन आम्ही तक्रार दाखल करून घेऊ शकतो. ज्यांचे गाढव चोरीला गेले आहेत्यांनी तक्रार द्यावी, पण गाढव चोरीची फिर्यादच पोलीस स्टेशनला आली नाही.- नरेंद्र ठाकरे (ठाणेदार)पोलीस ठाणे, अचलपूर.
चोरांची नजर आता गाढवांवर !
By admin | Updated: April 28, 2016 00:15 IST