चांदुर रेल्वे :-
फोटो -
वीरेंद्र जगताप : मतदारसंघात बुलेट ट्रेनला थांबा द्या
चांदूर रेल्वे : समृद्धी महामार्ग निर्मिती करताना अनेक आश्वासने शासनाकडून देण्यात आली. परंतु एकदा जमीन अधिग्रहित झाल्यानंतर रस्ता बांधकाम होत असताना अनेक अडचणींचा सामना मतदारसंघातील शेतकऱ्यांना करावा लागला. तशाच प्रकारची फसवणूक बुलेट ट्रेन निर्मितीच्या वेळी होऊ नये याची आताच खबरदारी घ्यावी, असे रोखठोक मत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी मांडले.
स्थानिक तहसील कार्यालयाच्यावतीने आयोजित मुंबई-नागपूर हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या पर्यावरण आणि सामाजिक विचारांसाठी सार्वजनिक सल्ला व मसलतीच्या आयोजित बैठकीत वीरेंद्र जगताप बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार राजेंद्र इंगळे, रेल्वे प्रकल्पाचे श्याम चौगुले आदी उपस्थित होते. मतदारसंघातील ज्या भागातून समृद्धी महामार्ग गेला, त्याच भागातून बुलेट ट्रेन जात आहे. त्याची माहिती देण्यासाठी आणि समस्या व सूचना ऐकून घेण्यासाठी स्थानिक यादव मंगल कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. यावेळी समृद्धी महामार्गाच्या संपादित क्षेत्रातून जात आहे, तर ही समृद्धीसाठी घेतलेली जमीन बुलेट ट्रेन प्रकल्पाला कशा माध्यमातून दिली, त्याचे स्वरूप सांगण्यात यावे. याशिवाय बुलेट ट्रेनच्या कंपनामुळे परिसरातील नागरिकांचे काही नुकसान झाल्यास त्याचे काय आणि या बुलेट ट्रेनचा मतदारसंघातील शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना लाभ व्हावा, यासाठी घुईखेड, तळेगाव किंवा शिवनी या परिसरात थांबा द्यावा, हीदेखील मागणी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी यावेळी लावून धरली. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.