गणेश वासनिक - अमरावतीमहानगरातील साडेआठ लाख लोकसंख्येच्या मूलभूत सोईसुविधांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या महापालिका दवाखान्यात मागील आठ महिन्यांपासून अॅन्टीरॅबीजची लस नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. तर दुसरीकडे शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून कुत्रे चावण्याच्या घटना वाढल्या आहेत. जीवाची भीती म्हणून अनेक रुग्ण ‘अॅन्टीरॅबीज’चे लसीकरण घेण्यासाठी इर्विनमध्ये धाव घेत आहेत.नागरिकांपासून आरोग्य सेवा कर घेणाऱ्या महापालिका प्रशासनाने आठ महिन्यांपासून ‘अॅन्टीरॅबीज’ची लस उपलब्ध नसताना याविषयी कोणत्याही उपाययोजना करीत नसल्याचे वास्तव आहे. एकीकडे दवाखान्यात अॅन्टीरॅबिजची लस नाही तर दुसरीकडे कुत्र्यांच्या नसबंदीला ब्रेक अशा परिस्थितीत शहरात मोठ्या संख्येने कुत्र्यांची संख्या वाढीस लागली आहे. हल्ली कुत्र्यांच्या प्रजननाचा काळ असल्याने गल्लीबोळात कुत्र्यांचा कळप दिसून येत आहे. हिवाळा ऋतुत कुत्रा चावण्याच्या घटना दरवर्षी घडतात. मात्र, महापालिका पशुशल्य विभागाच्यावतीने यंदा कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली नसल्याने प्रजननक्षमता वाढीस लागली आहे. महानगरात मोकाट कुत्रे नसतील, अशी एकही वस्ती अस्तित्वात नाही. गल्लीबोळात कुत्र्यांच्या हैदोसाने नागरिक त्रस्त झाले असून, चावा घेत असल्याचा घटना घडत आहे. अशातच महापालिका दवाखान्यात अॅन्टीरॅबिजची लस उपलब्ध नसल्यामुळे सामान्य, गरिबांना ती खासगी दवाखान्यातून घेणे परवडणारी नाही. एका अॅन्टीरॅबिजच्या लसीसाठी खासगी दवाखान्यात ३५० ते ४०० रुपये मोजावे लागते. त्यामुळे गरिबांना अॅन्टीरॅबिजची लस शासकीय दवाखान्यात घेतल्याशिवाय गत्यंत्तर नाही. परंतु कुत्रा चावताच त्वरित नजीकच्या महापालिका दवाखान्यात लस लावून घेण्याची अनेकांची तयारी राहते. मात्र महापालिकांच्या दवाखान्यात आठ महिन्यांपासून अॅन्टीरॅबिजची लस नसल्यामुळे ती घेण्यासाठी रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात जावे लागत आहे. महापालिका प्रशासन आरोग्य सेवेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळण करीत असताना अॅन्टीरॅबिजची लस उपलब्ध करु देऊ नये, ही खेदाची बाब मानली जात आहे.
महापालिका दवाखान्यात ‘अॅन्टीरॅबीज’ लस नाही
By admin | Updated: December 15, 2014 22:48 IST