दोन दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील शिक्षकांनी एकजूट दाखवत तीन कोविड रुग्णालयांची निर्मिती केली. ही वार्ता सर्वत्र पसरली तेव्हा त्या जिल्ह्यातील शिक्षकांवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. समाज माध्यमांवर ‘तेथील शिक्षक करू शकतात, मग येथील का नाही?’ हा मुद्दा काहींच्या काळजाला भिडला व यातून ‘चला जीवन वाचवू या’ ही संकल्पना पुढे आली.
यामध्ये जिल्हा परिषदअंतर्गत असलेल्या सहा हजार शिक्षकांना प्राथमिक शिक्षक समितीने आवाहन केले आहे. त्यांच्या सहकार्यातून मदतनिधी उभारला जाणार आहे. प्राथमिक शिक्षकांचे हे प्रेरणादायी कार्य समजल्यावर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागातील मुख्याध्यापक संघाला ही बाब आवडली. त्यांनीसुद्धा तनमनधनासह प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी पाऊल उचलले आहे.
अधिकाऱ्यांसह सेवानिवृत्तांचा सहभाग
प्रथमच सर्वसामान्य शिक्षकांद्वारे आलेल्या सामाजिक कार्यासाठी अधिकाऱ्यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही बाब जेव्हा सेवानिवृत्तांना समजली तेव्हा त्यांनीही यामध्ये खारीचा वाटा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. निवेदनातुन कोविड सेंटर उभारणी करीता वेतनातुन किंवा जि.प.कल्याण निधीतून निधी घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.