अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आपल्या फुफ्फुसाची स्थिती कशी आहे, हे पाहण्यासाठी आरोग्य विभागाने सोपी पद्धत सांगितली आहे. घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची ही चाचणी आहे. ही वॉक टेस्ट करण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
या टेस्टद्वारे नागरिक घरीच ऑक्सिजनची चाचणी करू शकताात. याद्वारे आपल्या आरोग्याची स्थिती कशी आहे व डॉक्टरांच्या सल्ल्याची केव्हा आवश्यकता आहे, हे या चाचणीवरून स्पष्ट होणार आहे. ताप, सर्दी व खोकला किंवा होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना ही चाचणी करता येणार आहे. ही चाचणी कडक जमिनीवर करावी लागते. त्याचप्रमाणे ज्या जमिनीवर चालणार आहात ती चढ-उताराची नको त्याचप्रमाणे पायऱ्यांवर ही चाचणी केली जाऊ शकत नाही. त्यातल्या त्यात घरातल्या कडक फरशीवर ही चाचणी करणे केव्हाही चांगले. चालण्यासाठी जास्तीत जास्त रिकाम्या जागा असलेल्या ठिकाणी ही चाचणी करणे योग्य ठरणार आहे. ही चाचणी करण्याचा सल्ला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिला आहे.
बॉक्स
अशी करा चाचणी
चाचणी करण्यापूर्वी बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची पातळी नोंद करावी. त्यानंतर ऑक्सिमीटर तसेच बोटाला ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे. अतिवेगात किंवा हळू चालू नये. सहा मिनिटे चालून झाल्यावर ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी. या पातळीत काहीच फरक पडला नसेल तर प्रकृती उत्तम आहे, असे समजावे किंवा एक-दोन टक्क्यांनी ऑक्सिजनची पातळी कमी असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. काही बदल होत नाही. हे पाहण्यासाठी दिवसातून दोन वेळा ही चाचणी करावी.
बॉक्स
- तर घ्या काळजी
६० वर्षांवरील व्यक्तींने सहाऐवजी तीन मिनिटे चालून ही चाचणी करावी. शक्यतोवर एक व्यक्ती सोबत असावी. बसल्या जागी दम किंवा धापा लागत असतील त्यांनी ही चाचणी टाळावी. या चाचणी दरम्यान ऑक्सिजन पातळी तीन टक्क्यांनी घसरल्यास किंवा ९३ च्या खाली आल्यास चाचणी थांबवावी आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
बॉक्स
कोणी करायची ही टेस्ट
ताप, सर्दी, खोकला, अथवा कोरोनाची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्ती, तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण यांनी ही चाचणी करायची आहे.
बॉक्स
असे लागणार साहित्य
घड्याळ किंवा मोबाईलमधील स्टॉपवॉच, पल्स ऑक्सिमीटर
कोट
कोरोना संसर्गाची लक्षणे वाटल्यास घरच्या घरी घरी सहा मिनिटांची ही चाचणी करू शकता. होम आयसोलेशनमधील रुग्णांनाही सदर चाचणी करता येते. ऑक्सिजन कमी झाल्याचे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- विशाल काळे,
वौद्यकीय आरोग्य अधिकारी
महापालिका