क्षेत्र अपुरे : केंद्र सरकारकडे पाठविला प्रस्तावअमरावती : राज्यातील ताडोबा तर मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढीस लागल्यामुळे वाघांचे स्थलांतरण वाढीस लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या परवानगीने ताडोबा, पेंच येथील वाघ दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यानुसार प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असले तरी पाच प्रकल्प विदर्भात आहेत. वाघांच्या संख्येची अधिकृत आकडेवारी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली आहे. एकट्या विदर्भात २०० पेक्षा अधिक वाघ असल्यावर वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे. तसेच मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पांत ३५ ते ४० वाघ असल्याचा अंदाज आहे. मात्र, ताडोबा व पेंच या व्याघ्र प्रकल्पांत वाघांची वाढलेली संख्या बघता वाघांना मुक्त संचार करण्यासाठी जंगलक्षेत्र अपुरे पडत आहे.
त्यामुळे वाघ हे नागरी वस्त्यांच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. नागरी वस्त्यांमध्ये वाघांचा संचार वाढला की मानव विरूद्ध वाघ, असा संघर्ष उदभवू लागला आहे. परिणामी काही महिन्यांपूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्रांचे गोंदिया, भंडारा, तुमसर या भागात अस्तित्व दिसून आले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सुमारे १५० वाघ असल्याचा अंदाज व्याघ्रगणनेनंतर वर्तविला गेला आहे. राज्यात ताडोबा येथे सर्वाधिक वाघ आहेत. तसेच मेळघाट, ताडोबा, पेंच, सह्याद्री, नागझिरा, टिपेश्वर, बोर आदी व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या बऱ्यापैकी आहे. वाघांचे स्थलांतरण वाढल्याने त्यांचे संरक्षण धोक्यात आले आहे.
व्याघ्र प्रकल्प क्षेत्राबाहेर वाघांचा संचार ही बाब शिकाऱ्यांसाठी लाभदायक ठरणारी आहे. त्यामुळे ताडोबा, पेंच येथील वाघांना सुरक्षित प्रकल्पात स्थलांतरण करण्यासाठी वेगवान घडामोडी सुरु असल्याची माहिती आहे. व्याघ्र प्रकल्पातून वाघांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण करण्याबाबत ताडोबा- पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जी.पी.गरड यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शक ले नाहीत, हे विशेष.असे होईल वाघांचे स्थलांतर ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्पातून वाघांचे स्थलांतरण करताना ते कोणत्या व्याघ्र प्रकल्पांत स्थलांतरण करावे, हा निर्णय केंद्रीय वने- पर्यावरण विभाग घेईल. व्याघ्रांसाठी सुरक्षित क्षेत्राची निवड झाल्यानंतर वाघांना तांत्रिक पद्धतीने जेरबंद केले जाईल. स्थलांतरण करताना वाहतुकीच्या वेळी वाघांची दक्षता, काळजी घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी तैनात राहतील. संरक्षित पिंजऱ्यातून वाघांचे स्थलांतरण केले जाईल, अशी माहिती आहे.