अमरावती : उन्हाळ्याच्या वाढत्या दाहामुळे उष्माघात आणि व्हायरल तापासोबत डोकेदुखी, अशक्तपणा, त्वचेचे विकार आणि पोटदुखी यासारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. उन्हाची काहिली मिटविण्यासाठी गारेगार पदार्थांचा सारखा मारा केल्यामुळे घसादुखी तसेच टॉन्सिल्सच्या तक्रारीही वाढत आहे.
तपमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतो आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीचे तापमान ३७ ते३९ च्या घरात आहे. या तापमानवाढीचा प्रामुख्याने लहान मुलांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला आहे. उन्हाळ्यात उघड्यावर पदार्थ खाणे प्रकृतीसाठी हितकारक नसते. तसेच बर्फ घातलेली पेये प्यायल्यामुळेही पोटदुखीचा त्रास होतो. उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने तसेच शीतपेय प्यायल्यामुळे पोटामध्ये मळमळणे, जुलाब तसेच सतत उलटीचा त्रास होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. रुग्णालयांमध्ये हा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी ऋतू बदल होताना आहाराच्या सवयींमध्येही बदल करणे गरजेचे असते. मात्र हा बदल केला जात नाही. तेलकट व मसालेदार पदार्थ खाण्याच्या सवयी बदलल्या जात नाही. उष्माचा मारा चुकवण्यासाठी थंड पदार्थ खाल्ले जातात. लहान मुले रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना या पदार्थांचे अतिरिक्त प्रमाणातील सेवनामुळे त्रास होतो. त्यांची रोगप्रतिकार शक्ती अधिक कमी होते. अनेक लहान मुलांना थंड पदार्थांच्या सेवनामुळे त्रास होतो. उन्हाळा सुरू झाल्यानंतर या पदार्थांचे सेवन केल्यास त्यांचा त्रास अधिक बळावतो. त्यामुळे असे बदल लगेच करू नयेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
बॉक्स
उष्माघात होण्याची दाट शक्यता
उन्हात फिरल्याने त्वचेशी निगडित आजारही त्रस्त करू लागतात. प्रखर उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचेवर चट्टे येणे, पुरळ, घामोळ्या येणे आधी दुष्परिणाम जाणवतात. कडक उन्हात फिरल्याने उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशक्तपणा येणे चक्कर येणे, मळमळणे असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
बॉक्स
हे उपाय करा
हलके पातळ सुती कपडे घाला
बाहेर पडताना टोपी, गॉगल्स, स्कार्फचा वापर करा
भरपूर पाणी प्या
ताक, लस्सी, लिंबूसरबत यासारखी शीतपेये घ्या
गडद रंगाचे कपडे वापरणे टाळा
दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर जाणे टाळा
शिळे, उच्च प्रथिने असलेले अन्न टाळा
बाहेरचे अन्नपदार्थ, तेलकट पदार्थ टाळा
कोट
वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा आजार वाढत आहे. त्यामुळे प्रखर उन्हात घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर पडताना टोपी, गॉगल्स, स्कार्फचा वापर करावा. अधिक पाणी प्यावे, चक्कर अशक्तपणा मळमळ ताप यासारखी लक्षणे जाणवू लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. रेवती साबळे,
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी