शेंदूरजनाघाट : पूर्वी बैलाच्या मदतीने लाकडी घाण्यावर ऊसाचा रस काढण्याचा ग्रामीण भागात व्यवसाय होता. हा रस अतिशय शुद्ध व चवदार असायचा यांंत्रिक युगात आता मात्र बैलाची जागा यंत्राने घेतली. आता तर यंत्राच्या साह्याने काढलेला रस गल्लीबोळात पोहोचला. मात्र, बैलाच्या घाणीवरून काढलेला रसाचा स्वाद हा रस देऊ शकला नाही. त्यामुळे गरिबाच्या शीतपेयाची ती जुनी चव इतिहासातजमा होत असल्याचे दिसून येत आहे.
एकेकाळी ग्रामीण भागातील सर्वाधिक खपाचे शीतपेय म्हणून ओळखल्या जाणारा उसाचा रस बहुराष्ट्रीय शीतपेयाच्या आगमनाने मागे पडलेला दिसत असला तरी विद्युत यंत्राच्या साह्याने लोखंडी ऊसातून निघाणाऱ्या रसापेक्षा लाकडाच्या घाणीतून निघणारा ऊसाचा रस अधिक चवदार असल्याची प्रतिक्रिया आजही ग्रामीण भागात व्यक्त होत आहे. शहरी भाग व तालुक्याच्या ठिकाणी उन्हाळ्याच्या मोसमात रसवंत्या थाटल्या जातात. या सर्व रसवंत्यांमध्ये विद्युत मोटारीवर चालणाऱ्या लोखंडी यंत्रावरून ऊसाचा रस काढण्यात येतो. अतिशय कमी जागेत हे यंत्र बसविले जात असल्याने व्यावसायिकाला ते सोयीचे होते. या रसात बर्फ टाकल्याने ग्राहकांना थंड रस मिळतो. त्यात लिंबाचा समावेश असल्याने रसाच्या चवीत अधिकच भर पडते. या रसाचे चलन शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक असते. थंड शीतपेयाच्या किमतीच्या तुलनेत रस पिणे अधिक परवडत असल्याचे ग्राहकांचे मत आहे.
पूर्वी बैलाच्या साह्याने घाण्यातून निघणाऱ्या रसापासून ग्राहकांना तो समाधान मिळत होता ते समाधान यंत्राच्या साह्याने निघणाऱ्या रसातून मिळत नसला तरी आर्थिकदृष्ट्या तो परवडणारा असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागात आजही व्यक्त होत आहे. आता बैलाची किमत वाढली व बैल हाकलण्याचा माणसाला मजुरी द्यावी लागत होती. यातून सुटका मिळण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जाते तर ते यंत्र गावात फिरवून गल्ली-बोळात रस विक्रेते दिसून येते.