कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही शाळा प्रत्यक्ष सुरू होणार नसल्याने विद्यार्थ्यांचा शाळेत किलबिलाट दिसला नाही. मात्र, आभासी किलबिलाट राहील. अचलपूर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी वसंत मनवरकर यांच्या माहितीनुसार ९ ग्रामीण भागातील केंद्र तर २ केंद्र शहरी भागातील आहेत. पथ्रोट, परसापूर, असदपूर, कुष्ठा, रासेगाव, भूगाव, बोपापूर, धामणगाव, मल्हारा, न.प. शहर अचलपूर, परतवाडा केंद्राचा समावेश आहे. एकूण २६६ शाळेत जि.प. १२९, नगर परिषद २९ व खासगी १०७ शाळा समाविष्ट असून जि.प.शाळेत पात्र मुख्याध्यापकासह ४४४ शिक्षक कार्यरत आहेत. यात उच्य श्रेणी मुख्याध्यापकाची मंजूर पदे २१ असून कार्यरत १३ आहेत. इतर प्रभारींच्या खांद्यावर मुख्याध्यापक पदाचे ओझे आहे. २०२० च्या शैक्षणिक सत्रानुसार तालुक्यातील एकूण पटसंख्या ४७५२४ आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील शाळा सुरू झाल्या. काही शिक्षक रविवारी, तर काही सोमवारी सकाळी मुख्यालयी हजर झाल्याची माहिती मिळाली. दुपारीच दुर्गम भागातील शिक्षक दांडी मारून गूल झालेत. शाळा सुरू झाली. मात्र, पटावरील विद्यार्थी शाळेत नसल्याने शाळेचा परिसर ओकाबोका, सुनसान दिसून आला. याबाबत पालकांना बोलते केले असता, मांडवात नवरदेव नवरी आहे. मात्र, व-हाडीच नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राज्य सरकार विद्यार्थ्यांचे भवितव्य, भविष्य अंधकारमय करीत असल्याची खंत व्यक्त केली. आभासी पद्धतीने अध्ययन आणि अध्यापनाला प्राधान्य दिले आहे.
कोट
गतवर्षांतील दोन-तीन महिने वगळता शैक्षणिक प्रक्रिया आभासी पद्धतीनेच पार पाडावी लागली. शाळांकडून अधिक चांगल्या पद्धतीने शैक्षणिक कामकाज करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून मुख्याध्यापकांच्या केंद्रिय सभा घेण्यात आल्या.
- राजीव खोजरे शिक्षण विस्तार अधिकारी, पं. स. अचलपूर