राजरत्न सिरसाट/अकोला पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये अद्याप सार्वत्रिक स्वरू पाच्या पावसाला सुरुवात झाली नसल्याने पेरणीची गती खुंटली आहे. ज्या भागात पाऊस पडला, त्या भागातील शेतकर्यांनी मात्र पाऊस येईलच, या आशेवर पेरणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत पाच जिल्ह्यांमध्ये १२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, यामध्ये सर्वाधिक अडीच लाख हेक्टर क्षेत्र कापसाचे आहे. दरम्यान, पाच जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत केवळ ८१.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील पेरणीलायक क्षेत्र ३२ लाख ७५ हजार २00 हेक्टर आहे, पण दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आजमितीस केवळ १२ टक्के म्हणजेच ३ लाख ८१ हजार २00 हेक्टरवर शेतकर्यांनी पेरणी केली. यामध्ये सर्वाधिक २ लाख ५५ हजार हेक्टरवर कापूस, तर त्या खालोखाल ७८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. पाच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात ३५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, याच जिल्ह्यात २ लाख ५५ हजार हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये पूर्वहंगामी कापसाचे क्षेत्र आहे. दरम्यान, २३ जूनपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात १४ हजार २00 हेक्टर, अकोला १२ हजार ५00 हेक्टर, वाशिम २२ हजार ९00 हेक्टर, अमरावती १७ हजार ३00 हेक्टर, तर यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ३ लाख १७ हजार ३00 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.दरम्यान ,विभागीय कृषी सहसंचालक शु. रा. सरदार यांनी १00 मि.मी. पाऊस पडल्यानंतरच शेतकर्यांनी पेरणी करण्याचे अवाहन केले आहे. मूग, उडिदाची पेरणी घटण्याची शक्यता यावर्षी पाऊस लांबला असून, पडणारा पाऊस मोजक्याच भागात असल्याने मूग, उडिदाचा पेरा घटण्याची शक्यता आहे. येत्या चार ते पाच दिवस पाऊस न आल्यास शेतकर्यांना या क्षेत्रावर पर्यायी पिकांचे नियोजन करावे लागेल.विभागात ८१.२ मि.मी. पाऊसअमरावती विभागात २३ जूनपर्यंत सरासरी ११७ मि.मी. पावसाची गरज होती; परंतु प्रत्यक्षात ८१.२ मि.मी. पाऊस पडला. त्या पावसातही सातत्य नव्हते. बुलडाणा जिल्ह्यात ६८ मि.मी., अकोला ९0.७ मि.मी., वाशिम ८९.0 मि.मी., अमरावती ५९.९ मि.मी., तर यवतमाळ जिल्ह्यात ९८.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
व-हाडात पावणेतीन लाख हेक्टरवर पेरणी !
By admin | Updated: June 23, 2016 21:48 IST