अमरावती : मोर्शी तालुक्यातील बोडणा येथे चार वर्षांपूर्वी घडलेल्या युवतीच्या मृत्यूप्रकरणी तिच्या भावाविरुद्ध मोर्शी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. आशिष वाहाणे (२४) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, ३० डिसेंबर २०१६ रोजी अपर्णा वाहाणे ही तरुणी बेशुद्धावस्थेत घरी पडल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी आशिषला घरी होलावून घेतले. यानंतर आशिषने ऑटोरिक्षातून अपर्णाला मोर्शी येथे रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे तिला मृत म्हणून घोषित करण्यात आले. शिरखेड पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला.
शवविच्छेदनाच्या अहवालानुसार आणि घटनास्थळावरील काही पुराव्यांच्या आधारे अपर्णाच्या मृत्यूप्रकरणाचा तपास पोलिसांनी चालविला. तपासादरम्यान अपर्णा हिचा मृत्यू नव्हे, तर हत्या झाली, असा कयास लावण्यास पुरेसा पुरावा पोलिसांना मिळाला. त्यानुसार कुटुंबीयांचे बयाण नोंदविण्यात आले. यातून हत्येमागील मास्टर माईंड शोधून काढण्यात यश आले. शिरखेड पोलिसांनी ७ डिसेंबर रोजी आरोपी आशिष वाहाणे याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२. २०१ अन्वये गुन्हा दाखल केला. मोर्शी येथील कनिष्ठ श्रेणी न्यायालयात आरोपीला हजर केले असता, त्याला १२ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.
-----------
पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालानुसार, मृत अपर्णा हिचा ओढणीने गळा आवळून हत्या करण्यात आली. श्वास गुदमरल्याने ती गतप्राण झाली. आराेपी भाऊ असून, १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
- केशव ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक, शिरखेड.