ओली पार्टी : सीपींनी विचारला डीसीपींना जाबअमरावती : बडनेरा मार्गावरील एका आलिशान हॉटेलमध्ये ओल्या पार्टीत अर्धनग्न अवस्थेत नाच करुन धुमाकूळ घालणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीसह दोन युवकांना राजापेठ पोलिसांनी अटक केली. स्थानिक नवाथे चौकातील या हॉटेलमध्ये रविवारी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली. याप्रकरणाची सखोल चौकशी करून हॉटेल चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असे पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी सांगितले. बडनेरा मार्गावरील या हॉटेलमध्ये ‘फ्रेंडशिप डे’ निमित्त रविवारी काही महाविद्यालयीन युवक-युवतींनी ओल्या पार्टीचे आयोजन केले होते. मद्यप्राशन करून विद्यार्थ्यांनी डीजेवर ताल धरला होता. अर्धनग्न अवस्थेत नाचही सुरू होता. याची माहिती शहरातील एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच ते थेट हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासणारराजापेठ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. उपनिरीक्षक एम.के. मानकर, महिला पोलीस शिपाई उज्ज्वला तायडे घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्याचे कळताच तरूण-तरूणी सैरावैरा पळू लागले. दरम्यान पोलिसांना रंगोली पर्ल हॉटेल येथून पळताना स्वप्नील सुधाकर पाचपोर (रा. जवाहर नगर ) व सौरभ दिलीप इंगळे या दोन युवकांसह एका महाविद्यालयीन तरुणीला पकडले. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला. रात्री उशिरा त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक एम.के. मानकर यांनी दिली. हॉटेलमध्ये ‘रेव्ह पार्टी’ असे वृत्त सोमवारी काही वृत्तपत्रात प्रकाशित होताच पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेतली. त्यांनी यासंदर्भात पोलीस उपायुक्त गावराने यांना जाब विचारला. हॉटेलमध्ये नेमके काय घडले?, हॉटेल मालकाने कशासाठी परवानगी घेतली?, डीजेच्या तालावर नृत्याची परवानगी नसताना हॉटेल मालकाने परवानगी कशी व का दिली? याचा तपास करुन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश मेकला यांनी पोलीस निरीक्षक गणेश अणे व विधी अधिकारी अनिल विश्वकर्मा यांना दिली. यामध्ये दोषी आढळल्यास पोलीस अॅक्ट अंतर्गत कारवाई करुन हॉटेलचा परवाना का रद्द करण्यात येवू नये या आशयाची नोटीस हॉटेलच्या संचालकाला बजावण्यात येणार असल्याची माहीती पोलीस आयुक्तांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
‘त्या’ हॉटेलला देणार कारणे दाखवा नोटीस
By admin | Updated: August 4, 2014 23:29 IST