रात्री अंत्यस्कार : वीज कंपनीने दिले २० हजारांचे अर्थसहाय्यअचलपूर : मुलगा शेतात डवरणीसाठी गेलेला आणि काही अवधीनंतर आईही शेतात गेली. परंतु शेतात जाताच मुलगा जमीनीवर कोसळलेला दिसला. जवळ जाऊन पाहले असता तो मृतावस्थेत आढळून आल्याने त्या मातेचे अवसान फाकले आणि आईने जोरदार हंबरडा फोडला. मातृहृदय हेलावून टाकणारी ही घटना सोमवारी अचलपूर तालुक्यात वडगाव येथे घडली.वडगाव फत्तेपूर येथील युवा शेतकरी तुकाराम मारोती बावस्कर (२४) यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती आहे. यंदा त्याने शेतात कपाशीची लागवड केली. जिल्ह्यात दमदार पावसानंतर थोडा अवकाश मिळाल्याने या युवा शेतकऱ्याने शेतात डवरणीचे काम सुरु केले होते. डवरणी करीत असतांनाच बैलाच्या मानेवरील जू शेतातील विद्युत खांबाच्या गार्डींगमध्ये अडकले. जू काढण्याच्या प्रयत्नात त्याला विद्युत प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने तो शेतात खाली कोसळला. काही वेळाने त्याची आई लकीबाई बावस्कर या मुलाला पाहण्यासाठी शेतात आल्या परंतु त्यांना मुलगा तुकाराम हा जमीनीवर मृतावस्थेत पडून दिसला. हे पाहून त्यांनी हंबर्डा फोडला. त्यांच्या रडण्याचा आवाज आसपासच्या शेतात असणाऱ्या शेतकऱ्यांनाही गेला. सर्व शेतकरी घटनास्थळी गोळा झाले. तुकारामला अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. तुकारामच्या निधनाची वार्ता वडगाव फत्तेपुरात वाऱ्यासारखी पोहचली आणि अख्खे गाव शोकसागरात बुडाले. विद्युत विभागाच्या लापरवाहीमुळे घरातील कर्त्या पुरुषाचा जीव गेल्याने नागरिक संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी मृतदेह राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात नेला. जोपर्यंत बावस्कर कुटुंबियांना आर्थिक मदत मिळत नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वीज कंपनीतर्फे शेतकरी कुटुंबाला तातडीची २० हजार रुपयाची मदत करण्यात आली. परंतु घरातील कर्तबगार मुलगा गेल्याची उणीव पैशाने न भरुन निघणारी आहे, अशाच प्रतिक्रिया उमटत आहेत.
मुलाचा मृतदेह बघताच आईने फोडला हंबरडा
By admin | Updated: August 5, 2014 23:13 IST