अवैध वाळू वाहतूक : ६ लाख ४८ हजार दंड वसूलचांदूरबाजार : येथील महसूल विभागातर्फे ३ महिन्यात अवैध रेती वाहनांवर कार्यवाही करून ५ लाख ७ हजार दंड वसूल केला आहे. यात २१ अवैध रेती वाहतूक करणारी वाहने व २ अवैध लाकूड वाहनांचा समावेश आहे. तसेच ७८ ब्रास अवैध रेती साठा जप्त करून १ लाख ४१ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. ६ लाख ४८ हजार रूपये शासन तिजोरीत महसूल जमा करण्यात आला आहे. तालुक्यात पूर्णा, मेधा व चारगढ या मोठ्या नद्यांसह लहानमोठे अनेक नाले असून त्यांचा उगम सातपुडा पर्वतामधून होत असल्यामुळे या नद्यानाल्यांना मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा असतो. तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असून या बांधकामांना मोठ्या प्रमाणात रेतीचा उपयोग होत असल्यामुळे याकरिता वाळू माफीयातर्फे चोरट्या मार्गाने रेतीची तस्करी केली जाते.मात्र या वाळू माफीयांचा मुसक्या आवळण्यासाठी महसूल विभागातर्फे धडक मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये गत ३ महिन्यात २१ रेती वाहनांवर कारवाई करून ५ लाख ७ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ७२ ब्रास अवैध रेतीसाठा सुद्धा जप्त करण्यात आला आहे. यासोबतच २ अवैध लाकूड वाहून नेणाऱ्या ट्रकवर कारवार्ई सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या ३ महिन्यात स्थानिक महसूल विभागातर्फे ६ लाख ४८ हजार १०० रूपये दंड वसूल करण्यात आला. उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के यांच्या मार्गदर्शनात प्रभारी तहसीलदार सैफन नदाफ यांच्यातर्फे करण्यात येणाऱ्या या कार्यवाहीत मंडळ अधिकारी भारत पर्वतकर, राजाभाऊ ठाकरे, गजेंद्र मानकर, ए. एन. भुजाडे, पी. वाय. पठान, अहमद हुसेन मो. मुश्ताक यांनी वाळू चोरट्यांना जेरीस आणले आहे. वाळू चोरी रोखण्यासाठी ही मोहिम सुरु राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
महसूल विभागाने केली २३ वाहने जप्त
By admin | Updated: October 22, 2015 00:18 IST