वरठी : १ जुलैपासून भंडारा रोड रेल्वे स्थानकावर गीतांजली व समता एक्स्प्रेस थांबणार नाही. लोकसभेच्या निकालानंतर रेल्वे प्रशासनाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. सदर प्रवासी रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी खासदार नाना पटोले यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. १ जुलैकरीता अजून १५ दिवस बाकी आहेत. पत्र लिहून मागणीला आठवडा झाला पण तुर्तास काही निर्णय झाला नाही. सध्या भंडारा रोड रेल्वे स्थानकाकरिता या गाड्याचे आरक्षण देणे बंद आहे. अनेक दिवसापासून मागणी असणाऱ्या गाड्या अचानक बंद होणार म्हणून जिल्हाधिकारी चिंतेत आहेत. गीतांजली व समता एक्स्प्रेसकरिता वातावरण तापणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.सध्या मृग नक्षत्र सुरू आहे. बदलत्या ऋतूप्रमाणे देशातील राजकारणासह जिल्ह्यात मोठा फेरबदल झाला. फेरबदल होऊनही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. जे होते त्यांनी केले नाही म्हणून लोकांनी त्यांना रस्ता दाखवला. ज्यांच्याकडे काम अपेक्षेने दिले आहे त्यांनी केले नाही तर भविष्याती परिणाम भोगावे लागतील असा जनतेचा समज आहे. एकंदरीत उन्हाळ्यानंतर उष्णतेपासून उसंत मिळणाऱ्या ऋतूत गीतांजली व समता एक्स्प्रेसच्या थांबा पूर्ववत सुरू रहावा म्हणून घाम फुटण्याची शक्यता आहे.गीतांजली एक्स्प्रेस ही मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरून धावणारी सर्वात जुनी रेल्वे गाडी. भंडारा जिल्ह्याच्या ठिकाण भंडारा रोड रेल्वे स्थानकावर सुरू झाल्यापासून थांबत नव्हती. याबाबत जिल्ह्यातील काही प्रवासी संघटना व वरठी येथील लोकप्रतिनिधींनी गाडी थांबावी म्हणून माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्याकडे रेटून धरली. पटेल यांनी भंडारा रोड रेल्वे स्थानकावर गाडीचा थांबा मिळवून दिला. गतवर्षी मे महिन्यापासून भंडारा रोड रेल्वे स्थानकावर या गाडीचा थांबा सुरू झाला. मुंबई-हावडा मार्गावर कार्यालयीन काम व या रस्त्यावर असलेल्या धार्मिक स्थळाना जाण्याकरीता अत्यंत उपयुक्त गाडी होती. ती अचानक बंद होत असल्यामुळे प्रवाशात अशांतता पसरली आहे. गीतांजलीपाठोपाठ समता एक्स्प्रेस बंद होणार आहे. ही गाडी आठवड्यातून पाच दिवस हजरत निजामउद्दीन ते विशाखापट्टम या मार्गावर धावायची. समता एक्स्प्रेस एक दशकापासून भंडारा रोड रेल्वे स्थानकावर थांबायची. गीतांजली व समता एक्स्प्रेस बंद करण्याचे कुठलेही ठोस कारणे रेल्वे प्रशासनाने दिलेले नाही. भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या अतिजलद रेल्वे गाड्या थांबा मिळवण्यासाठी प्रफुल पटेल यांचा सिंहाचा वाटा आहे. गितांजली एक्स्प्रेसचा थांबा मिळवण्याकरीता त्यांचेच वजन कामात आले होते. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्या काळात मिळालेली हिरवा कंदील खासदार नाना पटोले यांच्या काळात अचानक लाल मध्ये रूपांतर होणार असल्यामुळे त्यांना थांबा पुर्वरत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. (वार्ताहर)
गीतांजली व समता एक्स्प्रेसचे आरक्षण बंद
By admin | Updated: June 14, 2014 23:22 IST