जिल्हा परिषद, वित्त समिती विभागाप्रमुखांकडून नोंदविली डिमांड
अमरावती : जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाचे २०२१-२२ च्या बजेटला अंतिम सुधारित आणि २०२१-२२ च्या मूळ अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी विविध विभागप्रमुखांकडून निधीची डिमांड नोंदवून वित्त समिती सभेतील चर्चेनंतर अर्थसंकल्पाची शिफारस करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद वित्त समितीची सभा सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. यावेळी समितीचे सदस्य राजेंद्र बहुरूपी, बन्सी जांबेकर, शिल्पा हांडे समितीचे सचिव तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे आदी उपस्थित होते. वित्त समिती सभेत जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्नाचे सन २०२०-२१ चे अंतिम सुधारित व सन २०२१-२२ चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवण्यात आले. या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकातील तरतुदींवर सभेत चर्चा करण्यात आली. यावेळी बांधकाम, सिंचन, पाणीपुरवठा, शिक्षण, समाजकल्याण, पशुसंवर्धन, आरोग्य, महिला व बालकल्याण, पशु संवर्धन, पंचायत आदी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून योजना व विविध कामांसाठी लागणाऱ्या निधीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून बजेटमध्ये आपल्या विभागाच्या तरतुदीबाबत केलेल्या निधीची डिमांड नोंदविण्यात आली. सोबतच नवीन उपक्रमासाठी अधिक निधी लागणार आहेत. याची माहिती घेऊन त्याकरिता वाढीव निधीच्या शिफारसी अधिकाऱ्यांनी सभेत केल्या आहेत. दरम्यान वित्त समितीत झालेल्या चर्चेनंतर आगामी २०२०-२१ चे अंतिम सुधारित अंदाजपत्रकासह २०२१-२२ च्या मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाला जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी शिफारस करण्यात आली आहे. यावेळी सभेला डेप्युटी सीईओ दिलीप मानकर, प्रशांत थोरात, बांधकामच्या कार्यकारी अभियंता नीला वंजारी, सिंचने शिरीष तट्टे, पाणीपुरवठ्याचे जितेंद्र गजबे, समाजकल्याणचे सुधीर जिरापुरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय राहाटे, प्राथमिक शिक्षणाधिकारी ई.झेड. खान आदी उपस्थित हाेते.
बॉक्स
सभापतींच्या वित्त अधिकाऱ्यांना सूचना
जिल्हा परिषदेच्या आगामी अर्थसंकल्पाचे अनुषंगाने विविध विभागाकडून वित्त समितीत वाढीव निधीची मागणी खातेप्रमुखांनकडून नोंदविली आहे.त्या अनुषंगाने वाढीव निधी संदर्भात आवश्यक कारवाई करून तसा प्रस्ताव विशेष सभेकडे सादर करावा अशा सूचना वित्त सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.