चांदूर बाजार : काही दिवसांपासून तालुक्यातील मोबाइल सेवा आलटून-पालटून बंद पडत आहे. रेंज आणि कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने अनेकांनी मोबाइल कंपनी बदलल्या. मात्र, समस्या कायम राहत असल्याने ग्राहकांची डोकेदुखी चांगलीच वाढत आहे.
फोन न लागणे, इंटरनेट सेवा बंद पडणे, वारंवार रेंज न मिळणे, फोन लागला तरी आवाज न येणे आदी प्रकार सध्या सतत घडत आहे. यामुळे काही ग्राहक या मोबाइल कंपनीची सेवा पेक्षा दुसºया कंपनीची सेवा बरी, म्हणत मोबाईल नंबर अन्य मोबाईल कंपनीत पोर्ट करीत आहे. मात्र त्यांचे तिकडेही समाधान होताना दिसत नाही.
काही बँका, पतसंस्था, कॅफे सेंटरना या विस्कळीत सेवेमुळे अडचणीत आल्या आहेत. अनेक बँकांमध्ये सर्व्हर बंद असल्याचा फलक झळकतो. मोबाईल कंपन्यांनी अनलिमिटेड डाटा फ्री या सुविधेतून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. रिचार्ज करूनही पूर्ण लाभ न मिळता त्यातील काही तास दिवस विस्कळीत सेवेमुळे ग्राहकाची वेळ फुकट वाया जात आहे. परंतु ग्राहकांना रिचार्ज मात्र तारखेवरच करावे लागते. काही कंपनीचे फोर जी चे रिचार्ज केल्यानंतरही टुजी किंवा थ्रीजी सेवा मिळते. त्यातही इंटरनेटची गती मिळत नाही. या मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून काहींनी छोटे-छोटे व्यवसाय सुरू केले. मात्र रेंज मिळत नसल्याने सर्वांनाच मोठे नुकसान सोसावे लागते.
रिचार्जचे दर वाढले
अनलिमिटेड डेटा फ्री च्या नावावर मोबाइल कंपनीने रिचार्जचे दर वाढविले आहे. त्यामुळे ग्राहकांचे कंबरडे मोडत असून आवश्यक आहे म्हणून चालू द्या, असे काही ग्राहकांतर्फे बोलले जात आहेत. रिचार्जच्या दरात वाढ करूनही ग्राहकांना सुविधा पुरविल्या जात नाहीत. मोबाइलच्या चांगल्या सेवेची हमी मात्र कोणी देत नाही, अशी सार्वत्रिक ओरड आहे.
--------------------------