अमरावती : वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान कायम हद्दपार करण्याची लढाई महिलांनी जिंकल्यानंतर आता नव्याने सात देशी दारुविक्री दुकानांचा प्रश्न पेटणार आहे. ही दुकाने हद्दपार करण्यासाठी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र वडाळीतील संघर्षांची धग लक्षात घेता इतर ठिकाणच्या महिलाशक्ती एकवटणार असल्याचे चित्र आहे.येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात यापूर्वी प्राप्त तक्रारीनुसार नवाथे चौक, राधानगर, रहाटगाव, अंबागेट, बिच्छुटेकडी, मसानगंज आणि बडनेऱ्यातील जुनिवस्ती येथील देशी दारु विक्री दुकानांचा प्रश्न सतत कायम आहे. ही सर्व दारु विक्रीची दुकाने नागरी वस्त्यांमध्ये असल्यामुळे महिलांमध्ये सतत आक्रोश पाहावयास मिळतो. मात्र दारु विक्रेत्यांच्या धनशक्तीपुढे आंदोलक महिलांना माघार घ्यावी लागते; तथापि वडाळी येथील आंदोलक महिलांनी हे देशी दारुविक्रीचे दुकान हटविण्यासाठी जो संघर्ष केला, एकजुटीने धनशक्ती विरुद्ध लढा पुकारला तो नक्कीच दारुबंदीच्या लढ्यासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. दारुचे दुकान हद्दपार करण्यासाठी चक्क जलकुंभावर चढून या मागणीची तीव्रता महिलांनी वाढविली. महिला जलकुंभावर चढून दारु दुकान हटविण्याची मागणी करीत होत्या, त्याचवेळी विधिमंडळात विद्या चव्हाण, यशोमती ठाकूर आदी महिला आमदार शासनकर्त्यांना हे दारुचे दुकान केंव्हा हद्दपार करणार असा जाब विचारत होत्या. वडाळी येथील महिलांच्या लढ्याला आलेले यश हे इतिहासात नोंद करणारे आहे. गरीब, अज्ञानी तरीही एकजुटीने या महिलांनी लढा देत हे दारुविक्रीचे दुकान हद्दपार करुन दाखविले. त्यामुळे या महिला संघर्षाची प्रेरणा घेण्याची इतर भागातील आंदोलक महिलांनी तयारी चालविल्याची माहिती आहे. त्यामुळे काही वर्षांपासून देशी दारु विक्रीचे दुकाने हटविण्याच्या मागणीला वेग येण्याचे संकेत आहेत. राधानगर परिसरात असलेले देशी दारु विक्रीचे दुकान अगदी महापालिका शाळेपासून काही अंतरावरच आहे. त्यामुळे या दुकानाला मंजुरी देताना कोणते नियम लावण्यात आहे, हा संशोधनाचा विषय आहे. देशी दारु विक्रीचा परवाना नुतनीकरण अथवा नव्याने जागेला मंजुरी देताना कठोर निकष आहे. मात्र नवाथे येथे असलेले देशी दारु विक्रीचे दुकान हे नझूलच्या जागेवर आणि नाल्याच्या काठावर असताना देखील या दुकानाला परवानगी कशी देण्यात आली? हे वेगळे आश्चर्य आहे. हाकेच्या अंतरावर शाळा, विद्यालये, खेटून घरे असल्याने व्यवस्था भंग पावेल, अशा जागेवर नवाथे येथे दुकान असल्याचे वास्तव आहे. दारु दुकानाला परवानगी देताना परिसरातील नागरिकांची नाहरकत कागदोपत्रीच दाखविली जाते. (प्रतिनिधी)
सात देशी दारु विक्री दुकानांचा प्रश्न पेटणार?
By admin | Updated: December 22, 2014 22:38 IST