उदासीनता : सहा उपविभागांना हवा सिंचन कार्यालयांचा दर्जाधामणगाव रेल्वे : जुना धामणगावसह सहा कार्यालये सिंचन कार्यालय म्हणून घोषित करण्यात यावे, यासाठी अप्पर वर्धा विभागाच्या अधीक्षक अभियंत्याला मागील १० वर्षांपूर्वी प्रस्ताव मागितला असताना अद्यापही हा प्रस्ताव शासनाला पाठविला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़मध्य विदर्भातील अमरावती जिल्ह्यासाठी अप्पर वर्धा प्रकल्प भाग्यलक्ष्मी ठरावा म्हणून तब्बल १३७६़६४ कोटी रुपयांमध्ये हा प्रकल्प ८४ किलो मीटर अंतरात विस्तारला आहे? जुना धामणगाव येथे सन १९८१ मध्ये उर्ध्व वर्धा विभाग क्रमांक तीनची स्थापना करण्यात आली़ आसेगाव, देवगाव, मंगरूळ दस्तगीर, धामणगाव, शेंदूरजना खुर्द असे पाच उपविभाग त्यावेळी तयार करण्यात आले़ उपविभागीय अभियंता, पाच शाखा अभियंता, पाच तांत्रीक सहाय्यक, एक वरिष्ठ लिपिक, एक कनिष्ठ लिपिक, शिपाई, मजूर वर्ग असे प्रत्येक उपविभागीय कार्यालयांना कर्मचारी देण्यात आले होते.अंजनसिंगी ते रायपूर कासारखेडा, भातकुलीपर्यंत उर्ध्व वर्धा कालव्याचा परिसर येतो. १९९८ पासून या भागाला सिंचनाचे पाणी मिळत आहे़ खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी हे पीक घेतल्यानंतर तालुक्यातील शेतकरी रबी हंगामात गहू व हरभरा ही पिके घेतात. मागील दहा वर्षांत परिसरातील शेतकरी दोन पिके एका वर्षात घेत आहे. आर्थिक स्थिती मजबूत होत असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीत येत असलेल्या गहू, हरबऱ्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते़धामणगाव रेल्वे तालुक्यात अनेक गावातील शेतकरी हे अप्पर वर्धाच्या कालव्याचे पाणी शेतीसाठी वापरतात. या पाण्याच्या भरवशावर येथील शेतकरी रबीचे पीक घेतात. दरवर्षी खरिपातील सोयाबीनचे पीक निघाल्यानंतर हरभरा किंवा गव्हाची पेरणी येथे करण्यात येते. जुना धामणगाव विभागाचा कारभार सुरळीत सुरू असताना सर्वात प्रथम शेंदूरजनाखुर्द येथील उपविभागीय कार्यालय अमरावती येथे हलवून उर्ध्व वर्धा विभाग क्र मांक एक ला जोडण्यात आले़ मागील तीन वर्षांपासून येथील जुना धामणगाव विभागीय कार्यालयाला निधी देण्यात आला नाही़ उलट धामणगाव परिसरात झालेल्या कालव्याच्या दुरूस्ती करण्याचे काम दुसरीकडे वळविण्यात आले आहे़ परिसरातील अनेक कालवे व पाटचऱ्यांची साफसफाई करण्यात आली नसल्याने हे पाणी थेट वाहत नाही. त्यामुळे कालव्याची साफसफाई होणे गरजेचे आहे. धामणगाव तालुक्यातील अनेक कालव्यांची थातूर-मातूर डागडूजी करण्यात आली आहे. परंतु कायमस्वरुपी दुरुस्तीसाठी निधीच नसल्याने हे काम रखडले आहे. जुना धामणगाव येथील विभागीय कार्यालयासाठी सत्तारुढ भाजपा सरकारने निधी द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)कृती आराखड्यात ७८ ते ८० कर्मचारी हवेतजुना धामणगाव अंतर्गत येणाऱ्या उपविभागात केवळ शाखा अभियंता कामकाज पाहत असून कालव्याचे पाणी सोडल्यानंतर या शाखा अभियंत्याची मोठी कसरत होते़ सिंचन क्षेत्र मोठे असल्याने अनेक शेतकऱ्यांची नाराजी ओढावून घ्यावे लागते़ त्यात कनिष्ठ अभियंता व तांत्रिक सहायक यांची पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत़ जर जुना धामणगाव विभाग मेंन्टनन्स म्हणजे सिंचन कार्यालय म्हणून घोषित झाले तर शाखा अभियंता, कालवे निरीक्षक, लिपिक, मजूर यांच्यासह कृती आराखड्याप्रमाणे प्रत्येक कार्यालयात ७८ ते ८० कर्मचारी शासनाला नियुक्त करावे लागणार आहे़ आतातरी प्रशासनाने शासनाला पत्र व्यवहार करून जुना धामणगाव कार्यालय म्हणून सिंचन कार्यालय घोषित करावे किंवा अनेक उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी पाठ पुरावा करावा, अशी मागणी होत आहे.सिंचन कार्यालयाचे भिजतघोंगडे जुना धामणगाव येथील कार्यालयाच्या क्षेत्रातील कालव्याचे काम पूर्ण झाल्याने हे कार्यालय मेंटेनन्स म्हणून घोषित करून अधिक कर्मचाऱ्यांचा भरणा करण्यासंदर्भात अधीक्षक अभियंता यांना शासनाने सन २००५ मध्ये माहिती मागविली होती़ विशेषत: नेरपिंगळाई, मोर्शी, तिवसा, देवगाव, तळेगाव, जुना धामणगाव हे विभागाचे कार्यालय सिंचन कार्यालय म्हणून घोषित करण्यात यावे, असे या पत्रात नमूद केले होते़ परंतु तत्कालीन अधीक्षक अभियंत्यांनी शासनाला ही माहिती पाठविली नसल्याने सिंचन कार्यालयाचे भिजतघोंगडे आजपर्यंत असेच राहिले आहेत़
ऊर्ध्व वर्धा कार्यालयाचा प्रस्ताव धूळ खात
By admin | Updated: May 24, 2015 00:35 IST