गणेश वासनिक
अमरावती : राज्यात कारागृहांत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून कैद्यांना नातेवाईकांसोबतच्या भेटीला मनाई करण्यात आली आहे. गत आठ महिन्यांपासून कैदी कुटुंबीयांची ख्यालीखुशाली जाणून घेण्यासाठी आतूर झाले आहेत. यात न्यायाधीन व शिक्षाधीन अशा दोन्ही प्रकारच्या कैद्यांचा समावेश आहे.
एप्रिल ते सप्टेंबर २०२० या दरम्यान कोरोनाने हैदाेस घातला. यात मुंबईचे ऑर्थर रोड, पुण्याचे येरवडा,
ठाणे, नागपूर व अमरावती मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसह अधिकारी, कर्मचारी संक्रमित आढळले होते. त्यामुळे गृहविभागाच्या कारागृह प्रशासनाने कोरोनाचा धोका रोखण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात कारागृहे साकारली आहेत. आजही नवीन कैद्यांना या तात्पुरत्या कारागृहात १५ दिवसांचा मुक्काम करावा लागतो. यादरम्यान कोविड चाचणी केल्यानंतरच कैद्यांना जुन्या कारागृहात पाठविण्याबाबत निर्णय घेतला जातो. कैद्यांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. राज्यात ९ मध्यवर्ती कारागृहे, ११ खुले कारागृहे, ४७ जिल्हा कारागृहे वर्ग - १ व वर्ग -२ तर दोन महिला कारागृहात गत आठ महिन्यांपासून कैद्यांना नातेवाईकांसोबतच्या भेटीला ब्रेक लावण्यात आला आहे.
---------------------
आठवड्यातून एक दिवस व्हिडीओ कॉलींगद्धारे बोलण्याची सुविधा
मार्चपासून कैद्यांना नातेवाईकांसोबत आमने-सामने ईंटरकॉम प्रणालीद्धारे बोलता येत नाही अथवा समोरासमोर बघता येत नाही. मात्र, आठवड्यातून एक दिवस कारागृहातून कैद्यांना व्हिडीओ कॉलींगद्धारे ५ ते ७ मिनिटे नातेवाईकांसोबत संवाद साधण्याची सुविधा आहे. मात्र, यासाठी कैद्यांना ’वेटींग’ मध्ये राहावे लागत असून, महिनाभरानंतरही नंबर लागत नसल्याची ओरड आहे.
------------------------------
कारागृहात संक्रमितांची संख्या ओसरली
राज्यात कारागृहात कैदी, अधिकारी अथवा कर्मंचाऱ्यांची कोरोना संक्रमितांची गत चार ते पाच महिन्यांपूर्वी असलेली संख्या हल्ली ओसरली आहे. आजमितीला अमरावती मध्यवर्ती कारागृहात केवळ दोन कैदी संक्रमित असून, त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आहे. हीच स्थिती कोरोनाबाबत अन्य कारागृहांची असल्याचे दिसून येते.
--------------
कैद्यांच्या नातेवाईकांसोबतच्या इंटरकाॅम भेटीला मनाई आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्यामुळे गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागत आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार यासंदर्भात कार्यवाही केली जाईल,
- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती