अमरावती : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) पाचवीपर्यंत प्राथमिक व आठवीपर्यंत उच्च प्राथमिक असा स्तर लागू करण्यास शालेय शिक्षण विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत येत्या शैक्षणिक वर्षापासून पाचवीचे ६२२ तर आठवीचे २४६ वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत चौथी व सातवीच्या वर्गापर्यंतचा स्तर आहे. शिक्षण हक्क कायद्यात पाचवी वर्गापर्यंत प्राथमिक व आठवी वर्गापर्यंत उच्च प्राथमिक अशी तरतूद करण्यात आली असल्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून हा स्तर लागू करण्यात येणार आहे. यामुळे ज्या शाळांत चौथीपर्यंत किंवा सातवीपर्यंत वर्ग आहेत त्या शाळांमध्येच हे वर्ग सुरू केले जाणार आहेत. हा नियम जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोमेंट बोर्ड या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी लागू आहे. अर्थात ज्या शाळेत चौथीचे वर्ग आहेत त्यांना पाचवी सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर सातवीपर्यंतच्या शाळांना आठवीचा वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
यंदापासून पाचवीपर्यंत प्राथमिक, आठवीपर्यंत उच्च प्राथमिक शाळा
By admin | Updated: June 16, 2014 23:16 IST