अमरावती : महापालिकेच्यावतीने सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत स्थानिक हबीबनगर ते पांढरी मारोती मंदिर ते व्हीएमव्हीपर्यंतच्या रस्ता नुतनीकरणाचे काम कंत्राटदारांनी अर्धवट सोडले आहे. नालीच्या अर्धवट बांधकामामुळे प्राणहानीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरुद्ध फौजदारी दाखल करण्यासाठी शहर अभियंत्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
गाडगेनगर
पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना दिलेल्या तक्रारीत शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांनी परतवाडा येथील संजय कंस्ट्रक्शन कंपनीचे पियुष बरडीया यांनी नगरोत्थान महाअभियान अंतर्गत हबीबनगर-पांढरी मारोती मंदिर-व्हीएमव्ही पर्यंतच्या रस्ता नुतनीकरण व नाली बांधकामाचे कंत्राट ३ कोटी ६७ लाख रुपयांत घेतले. या बांधकामाच्या कार्यारंभाचे आदेश नोव्हेंबर २0१३ मध्ये देण्यात आले. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटुनही रस्ता नुतनीकरण व नालीचे बांधकाम अपूर्णच आहे. हा वर्दळीचा रस्ता असल्याने तो लवकर पूर्ण करण्यात यावा, असे यापूर्वी संजय कन्स्ट्रक्शन कंपनीला नोटीसद्वारे कळविले. तरीही कामात सुधारणा झाली नाही. गेल्या दीड महिन्यांपासून रस्ता व नालीचे काम बंद असल्याने अर्धवट बांधकामामुळे नालीतील लोखंड(सळाखी) या नाली बांधकामाच्या अंदाजे ६ इंच वर आल्या आहेत. रस्त्याच्या बाजुने वर आलेल्या सळाखींमुळे प्राणहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंत्राटदाराला वारंवार मौखिक सूचना व नोटीस बजावून अवगत केले आहे. परंतु कोणतीही दखल कंत्राटदारांनी घेतली नाही. त्यामुळे या बांधकामामुळे कोणतीही दुर्घटना झाल्यास या घटनेला संजय कन्स्ट्रक्शन जबाबदार राहतील, अशी तक्रार नोंदविण्यात आली आहे. अर्धवट बांधकाम करणे आणि प्राणहानीची घटना घडल्यास कायदेशीर कारवाई करुन गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी सुध्दा अभियंत्याकडून संबंधितांकडे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)