गृहविभागाचे संकेत : चार स्वतंत्र ‘फाशी सेल’ निर्माण करण्याचा प्रस्तावअमरावती : शिक्षेवर शिक्कामोर्तब झालेल्या गुन्हेगारांना फाशी देण्याची व्यवस्था राज्यातील नागपूर व येरवडा कारागृहात आहे. मात्र, अमरावती मध्यवर्ती कारागृहात ही सोय नसल्याने येथे फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्यांचे स्थानांतरण करताना सुरक्षा यंत्रणेला करावी लागणारी कसरत, आणि त्यातील जोखीम लक्षात घेता अमरावती कारागृहातच फाशी देण्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि तत्सम व्यवस्था उभारण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. त्याअनुषंगाने गृहविभागाने कारागृह महासंचालकांना आदेशित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.सन १८६६ साली उभारण्यात आलेले अमरावती मध्यवर्ती कारागृह सर्वसुविधांनी युक्त आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सरकारने दाजीसाहेब पटवर्धन, दादासाहेब खापर्डे, माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांसारख्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना जेरबंद केले होते. आजही या कारागृहातील ज्या बराकीत स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना डांबून ठेवले गेले तेथे त्यांच्या स्मृती जपल्या जातात. ऐतिहासीक घटनांचे साक्षीदार असलेल्या अमरावती मध्यवर्ती कारागृहात सन १९८५पर्यंत फाशीची शिक्षा अंमलात आणण्याची व्यवस्था होती. त्याकरिता स्वतंत्र चार सेलदेखील निर्माण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर राज्य शासनाच्या गृहविभागाने अमरावती मध्यवर्ती कारागृहातील ही यंत्रणा मोडकळीस आणली. गृहविभागाने नागपूर, येरवडा मध्यवर्ती कारागृहानंतर आता अमरावती, नाशिक रोड कारागृहात फाशीची तत्सम यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. गुप्तचरवार्ता विभागाचा अहवालअमरावती : फाशी देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या यंत्रणेविषयी कमालीची गुप्तता पाळली जात आहे. राज्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले २५ पेक्षा अधिक कैदी आहेत. या कैद्यांना कोणत्याही क्षणी फासावर चढविण्याचे आदेश येऊ शकतात. त्यामुळे फाशीची परिपूर्ण व्यवस्था असलेल्या नागपूर आणि येरवडा कारागृहात या कैद्यांना स्थानांतरीत करताना सुरक्षा यंत्रणेला अतिरिक्त श्रम आणि अनेक संकटांचा सामना करावा लागतो, असा अहवाल राज्य गुप्तचर वार्ता विभागाने गृहविभागाला सादर केला आहे. त्यामुळे ब्रिटिश सरकारच्या काळात ज्या कारागृहांमध्ये फाशी देण्याची व्यवस्था आणि तत्सम यंत्रणा अस्तित्वात होती त्या कारागृहांमध्ये पुन्हा फाशी देण्याची व्यवस्था उभी करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच अमरावती मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यासाठीची आवश्यक व्यवस्था उभारली जाईल, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. ब्रिटिश सरकारच्या कार्यकाळात धुळे, येरवडा, अमरावती, ठाणे व नागपूर कारागृहांमध्ये फाशी देण्याची व्यवस्था होती, अशी माहिती आहे.‘ब्लॅक वॉरंट’ नंतरच दिली जाते फाशीजिल्हा सत्र न्यायालयाने एखाद्या प्रकरणात कैद्याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्या कैद्याला उच्च न्यायालयात धाव घेता येते. उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली तर त्या कैद्याला सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याची संधी दिली जाते. किंबहुना सर्वोच्च न्यायालयाने देखील ही फाशीची शिक्षा कायम ठेवल्यास त्या कैद्याला राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करता येतो. मात्र, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला तर पुन्हा ते प्रकरण संबंधित जिल्हा सत्र न्यायालयाकडे येते. त्यानंतर याच न्यायालयातून फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठीचा ‘ब्लॅक वॉरंट’ निघतो. या ब्लॅक वॉरंट’मध्ये वेळ, दिवस, तारीख निश्चित केली जाते. यासर्व बाबी अत्यंत गोपनीयरित्या हाताळल्या जातात.‘हँग टिल डेथ’नंतरच अंत्यसंस्कारफाशीचे शिक्कामोर्तब झालेल्या कैद्याला ज्यादिवशी फाशी दिली जाणार त्या दिवशी सकाळी त्याचे स्नान, धार्मिक पठण, जेवण देऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यानंतर कैद्याला फासावर लटकविले जाते. मानेचा मणका तुटला किंवा नाही हे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासले जाते. फाशी देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘हँग टिल डेथ’ असे म्हटले जाते. कैद्याला मृत घोषित केल्यानंतर त्याची पुन्हा वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यानंतर शवविच्छेदन केले जाते. हे सगळे सोपस्कार भल्या पहाटेच म्हणजे सूर्योदयानंतर लगेच पार पडतात. कारागृह परिसरातच त्या कैद्यावर त्याच्या धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार केला जातो. यासर्व बाबी अतिशय गोपनीय ठेवल्या जातात, हे विशेष.असे तयार होते फाशीचे तख्तफाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्याचा ‘ब्लॅक वॉरंट’ निघाल्यानंतर त्या कैद्याला कोठे फाशीची शिक्षा द्यावी, हे निश्चित होते. त्यानुसार कारागृहात फाशीचे तख्त तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इस्टिमेट तयार केले जाते. या इस्टिमेटनुसार शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जातो. नवीन पद्धतीचा अवलंब करुन फाशीचा खटका एकदाच पडेल, अशी व्यवस्था केली जाते. कैद्याच्या वजनाचा पुतळा तयार करुन फाशी देण्याचे प्रात्यक्षिक जल्लादकडून केले जाते. तसेच स्वतंत्र फाशी सेलमध्येच कैद्याला डांबून ठेवले जाते. शेवटची फाशी १९८५ मध्येअमरावती मध्यवर्ती कारागृहाला १५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. ब्रिटिश सरकारच्या कार्यकाळात अमरावती कारागृहात अनेकांना फासावर लटकविण्याचा इतिहास आहे. मात्र, येथे १९८५ साली एका अल्पसंख्यक समाजाच्या कैद्याला फाशी देण्यात आल्याची नोंद आहे. हीच फाशी अमरावती कारागृहात शेवटची फाशी ठरली आहे. त्यानंतर अमरावती कारागृहात फाशी देण्याची व्यवस्था मोडकळीस आणली गेली, हे विशेष.जेलरने बनविले होते याकुबच्या फाशीचे तख्तअमरावती कारागृहाचे अधीक्षक भाईदास ढोले हे नागपूर येथे कार्यरत असताना त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमनच्या फाशीचे तख्त बनविले होते. याकुबला नागपुरात ३० जुलै २०१५ रोजी फाशी देण्यात आली होती. यासाठी शासनाने २१ लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. फाशीची यंत्रणा किंवा तत्सम व्यवस्था सुरु करण्याबाबत वरिष्ठांकडून कोणतेही पत्रव्यवहार नाहीत. यासंदर्भात काही सूचना आल्यास कार्यवाही होईल. - भाईदास ढोलेअधीक्षक, मध्यवर्ती कारागृह
कारागृहात फाशीचे तख्त !
By admin | Updated: August 3, 2016 23:58 IST