निर्णय : सीसीएफ, आरएफओंचा समावेशअमरावती : राज्य शासनाने १ जुलै रोजी ‘एकच लक्ष, दोन कोटी वृक्ष’ ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आधी वृक्षलागवड नंतर बदल्यांची प्रक्रिया’या बाबीला मुख्य सचिवांनी प्राधान्य दिले आहे.१ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ जुलै रोजी दोन कोटी वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे. वनविभागाव्यतिरिक्त राज्य शासनाने अन्य ४३ विभागांना वृक्षारोपणाचे ‘लक्ष्य’ दिले आहे. दरम्यान येथील प्रादेशिक वनविभागाने वनपाल, वनरक्षकांच्या बदल्या लक्षात घेत वृक्षारोपणासाठी आवश्यक वनकर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी पाठवू नयेत, असे निर्देश दिले आहेत. राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य असले तरी जिल्ह्यात ४ लाख ८५ हजार वृक्षलागवडीचा लक्ष्यांक आहे. १ जुलै रोजी सर्व प्रशासकीय अधिकारी मुख्यालयी नव्हे तर वृक्षलागवडस्थळी हजर राहतील, असे शासनादेश आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पालकमंत्री, खासदार, आमदार अन्य लोकप्रतिनिधींना वृक्षारोपणात सहभागी व्हावे लागणार आहे. वृक्षारोपणात रोहयो मजुरांना सहभागी केल्यास त्यांना १ जुलै रोजी वेतन देण्याची तयारी विभागीय आयुक्तांनी केली आहे. वृक्षरोपणात हयगय अथवा कुचराई केल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश आहेत. १ जुलै रोजीच्या अनुषंगाने वृक्षारोपणाची तयारी करण्यात आली आहे. या उपक्रमात सामाजिक, शैक्षणिक संस्थांचा सहभाग राहणार आहे. अन्य संस्थाना वृक्षारोपणात सहभागी व्हायचे असल्यास संपर्क साधवा.- प्रदीप मसराम,उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण
आधी वृक्षारोपण, नंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Updated: June 19, 2016 23:59 IST