सावंगा विठोबात भक्तांची मांदियाळी : गुढीपाडव्याच्या यात्रेला विशेष महत्त्व चांदूर रेल्वे : तीनशे वर्षांपूर्वी अवधूत पंथाची स्थापना करणारे श्रीकृष्णाजी अवधुत महाराजांच्या पदस्पर्शाने पावन सावंगा विठोबानगरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाखोंचा कापूर पेटला. लक्षावधी भक्तांनी या भुताच्या यात्रेत हजेरी लाऊन कृष्णाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. समतेचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या देव व भक्तांच्या ७० फूट उंच दोन झेंड्यांना गुढीपाडव्याला नवीन खोळ चढविण्यात आली. येथील दिव्य धार्मिक विधी भाविकांनी त्यांच्या हृदयात जपून ठेवत आराध्याचे आशीर्वाद घेतले. लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीकृष्णाजी अवधुत महाराजांच्या यात्रेला मंगळवारपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली. दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांनी आप्तजनांच्या वजनाएवढा कापूर जाळून नवस फेडला व भोजनदान केले. पारंपारिक झांज व मृदंगाच्या साथीने संपूर्ण परिसर अवधुती भजनात रंगला होता. मंदिराचे विश्वस्त गोविंद राठोड, हरिदास सोनवाल, वामन रामटेके, दिनकर मानकर, विनायक पाटील, रूपसिंग राठोड, दत्तुजी रामटेके, कृपासागर राऊत, अनिल बेलसरे, दिगंबर राठोड, पुंजाराम नेमाडे, स्वप्निल चौधरी यांनी महोत्सवासाठी प्रयत्न केले. ७० फूट झेंड्यांना नवी खोळदेव व भक्तांच्या प्रतिकात्मक दोन झेंड्यांना नवीन खोळ चढविण्यास दुपारी ४ वाजता सुरुवात झाली. चरणदास कांडलकर यांनी कृष्णाजी महाराजांच्या बोहलीचे दर्शन घेतले. विधीवत पूजनानंतर दोन झेंड्यांना पायांचा स्पर्श न करता दोरखंडाच्या सहायाने जुनी खोळ काढली व ते उंच टोकावर पोहचले. दोन्ही झेंड्यांना नवीन खोळ टाकत कांडलकर खाली उतरले. हा चित्तथरारक सोहळा दोन तास चालला.पाणीटंचाईची झळ सावंगा विठोबा ग्रापने गावकऱ्यांसह यात्रेकरूंसाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था न केल्याने सावंग्यात पाणीटंचाई जाणवत होती. ग्रापंने टँकरव्दारे पाणीपुरवठा केला. मात्र, अनेक ठिकाणी पाणी पोहोचले नसल्याची ओरड होती. महिलांसाठी प्रसाधनगृह नसल्याने गैरसोय झाली. आरोग्य विभागाने यात्रेकरूंच्या सोईसाठी अॅब्युलन्स व डॉक्टरांची व्यवस्था केली होती.चोख बंदोबस्तजिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ अविनाश पालवे यांनी १६ पोलीस अधिकारी व ११३ पोलीस कर्मचारी व दंगा नियंत्रण दलाच्या जवानांनी यात्रे दरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहिली. मंदिर प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे बंदोबस्त व भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविले.
‘भुताच्या यात्रे’त पेटला लाखोंचा कापूर
By admin | Updated: March 30, 2017 00:18 IST