पाऊण एकरात साडेचार लाखांचे उत्पादन, राजुऱ्याच्या युवकाला बेभरवशाच्या पिकाने दिला हातराजुरा बाजार : मिरची बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या राजुऱ्यातील युवकाने याच पिकाच्या बळावर कोरोनाकाळात पावणेचार लाखांचे उत्पादन घेतले आहे. धोका पत्करून व बाजाराचे अवलोकन करून कोणताही व्यवसाय समृद्धी देतो, हे या नवशेतकऱ्याने दाखवून दिले. तुषार बहुरूपी असे सदर युवकाचे नाव आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही तरी कण्याच्या शोधात असलेल्या तुषारला कोरोनाकाळातील लॉकडाऊनने घरी बसविले. मात्र, हीच त्याच्यासाठी संधी ठरली. तो शेतीकडे वळला. वडिलोपार्जित नऊ एकर शेतातील संत्राझाडे वगळता तीन एकरात कपाशी व पाऊण एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड त्याने केली.१५ एप्रिलला मिरचीचे '' नवतेज'' बियाणे टाकून रोपे तयार केल्यानंतर जून महिन्यात पाऊण एकरात त्यांची लागवड केली. राजुऱ्याचा मिरची बाजार सुरू होताच ७२०० रुपये असा उच्चांकी दर मिळाला. मिरचीचे पाऊण एकरात १२५ क्विंटल उत्पादन झाले. कीटकनाशके, खते, मजुरीचा खर्च वगळता ३ लाख ७५ हजार रुपये निव्वळ नफा तुषारने कमावला. सध्या मात्र दर कमालीचे घसरले असल्याने तोडा केलेली मिरची सुकवून विकण्याचा त्याचा मानस आहे. परिसरात मिरचीवाला तुषार अशी ओळख त्याने निर्माण केली आहे.
---------------
धोका पत्करलाकोरोनाकाळात मिरची मार्केट चालू होईल की नाही, मिरची व्यापारी घेतील की नाही, याची शाश्वती नसताना, तुषारने धोका पत्करून मिरचीची लागवड केली. स्वतः शेतात फवारणी, खते मजुरी करून मजुरीचे पैसे वाचविले. अनुभवी मिरची उत्पादक शेतकऱ्यांकडून धडे घेतले. त्याच्या परिश्रमाचे चीज झाले आहे.
---------------
भाजीपालावर्गीय पिकांमध्ये रिस्क घ्यावीच लागते. कोण म्हणते, शेती परवडत नाही? शेतीशी प्रामाणिक राहून परिश्रम घेतल्यास नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असा माझा अनुभव आहे.
- तुषार बहुरूपी, मिरची उत्पादक, राजुरा बाजार