पान २ ची बॉटम फोटो पी ०५ नांदगाव
नांदगाव खंडेश्वर : गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली. सोयाबीनचे अंकुर जमिनीबाहेर आले आहेत. अशावेळी पाऊस नसल्याने पाण्यावाचून आता ते तळमळत आहेत. आधीच महागडे सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांनी जमिनीत पेरले. काही शेतकऱ्यांच्या शेतात पेरणीनंतर त्यावर पडलेल्या जोराच्या पावसाने बियाणे दडपले असले तरी बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवून बाळरोप शिवारात दिसून येत आहेत. पण, पावसाच्या दडीमुळे व रखरखत्या उन्हात ते कोमेजल्यागत दिसत आहेत.
पाऊस नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी तणनाशकाची फवारणी थांबवली. काही शेतात डवरणी सुरू आहे. ज्या शेतात सिंचनाची सोय आहे, त्यांनी पिकाला स्प्रिंकलरने पाणी देणे सुरू केले. चिंतातुर शेतकऱ्यांनी वरुणराजाचा धावा केला आहे.
पांडुरंगा, भक्त प्रल्हादाचे हाकेला तू धावून आला. जनाबाईच्या गोवऱ्या वेचल्या. सावत्याचा मळा राखला. द्रौपदीची विनवणी कानी पडताच तिच्या हाकेलाही तू धावून गेला. लाखो शेतकऱ्यांची चिलिपिली जगवण्यासाठी तरी या बळीराजाच्या हाकेलाही आता तू धाऊन ये. शिवारात मेघ बरसू दे, अशी त्यांची आर्त विनवणी आहे.