अमरावती: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गतवर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमरावती येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी निधी मंजूर केला नसल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीने केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत या शासनाकडे येथील वैद्यकीय महाविद्यालासाठी तात्काळ निधी मंजूर करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर नसतानाही त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतले आहे. परंतु अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर असतानासुद्धा या ठिकाणी कामासाठी निधी मंजूर उपलब्ध करून दिला नाही. तर दुसरीकडे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याला निधी मंजूर केला आहे. यात अमरावती जिल्ह्यावरच का अन्याय केला, असा प्रश्न उपस्थित करीत बीएसपीने वैद्यकीय महाविद्यालयासाठी तातडीने येत्या २६ जानेवारीपूर्वी निधी मंजूर करावा अन्यथा याविरोधात बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा या निवेदनाद्वारे बीएसपीचे शहर प्रमुख सुदाम बोरकर, दीपक पाटील, भगवान लोणारे, उमेश मेश्राम, जयदेव पाटील, राहुल सोमकुंवर, विक्की वानखडे, अरशद अली. भय्यालाल बडगे, प्रमोद शहारे, सचिन वैद्य व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधी मंजूर न केल्याने नागरिकांमध्ये रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:38 IST