समस्या : सल्ल्याशिवाय वापर ठरतोय घातकअरुण पटोकार - पथ्रोटवरुड, मोर्शी पाठोपाठ पथ्रोट परिसरातही संत्रा उत्पादनकांसाठी प्रसिध्द आहे. संत्र्यासोबत केळीसुध्दा या परिसरातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. परंतु योग्य सल्ल्याशिवाय संत्र्यावर कीटकनाशके, रासायनिक खते, तणनाशकांचा प्रमाणाबाहेर वापर केल्याने संत्र्यांच्या आंबिया बहराला गळती लागली आहे.बऱ्याचशा संत्रा बागांमध्ये तण व गाजर गवताची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. ते कापण्याकरिता मजुरांना अव्वाच्या सव्वा (२०० ते २५०) रुपये प्रत्येकी मजुरी द्यावी लागते. त्यातही कापणीकरिता मजूर मिळत नाही. त्यामुळे सोप्या व कमी खर्चाचा उपाय म्हणून शेतकरी पावसाळ्यात संत्राबागांवर तणनाशकांचा वापर करतात. यावर्षी ५० टक्के शेतकऱ्यांनी संत्रा बागेत तणनाशकांचा वापर केला. त्यामुळे या परिसरातील संत्राबागांमध्ये आंबिया बहराची मोठ्या प्रमाणात गळ होऊन गळलेल्या संत्र्यांचे शेतात ढिगारे लागलेले आहेत. दर तिसऱ्या दिवशी बागेतील गळलेली संत्री मजूर लाऊन शेताबाहेर उचलून फेकावी लागतात. त्यामुळे संत्र्याच्या बागा रिकाम्या होत आहेत. यावर्षी नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचा माग सोडला नाही. एप्रिल महिन्यात पथ्रोट परिसरातील काही भागांमध्ये गारपिटीचा फटका बसल्यामुळेसुध्दा संत्र्यांची गळती होत आहे. या परिणामांसाठी नैसर्गिक आपत्तीसोबत शेतकऱ्यांचे अज्ञानही कारणीभूत ठरले आहे. त्यातच संत्रा बागांमध्ये मृग बहराचीसुध्दा फूट झालेली नसल्याकारणाने कर्जबाजारी झालेला शेतकरी संकटात सापडलेला आहे. शासनातर्फे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याकरिता नवनवीन तंत्रज्ञान व उपाययोजना राबविल्या जातात. कोणत्या महिन्यात कोणत्या पिकावर कोणते खत, कीटकनाशक वापरावे यांची माहिती कृषी विभागातर्फे मोबाईलव्दारा शेतकऱ्यांना दिली जाते. मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही.
तणनाशकांमुळे संत्रा आंबिया बहराला गळती
By admin | Updated: August 13, 2014 23:34 IST