अमरावती : जिल्ह्यात कोरोना असतानाही मोठ्या प्रमाणात विवाह झाले असताना १ जानेवारी ते नोव्हेंबर २०२० पर्यंत ४२८३ जोडप्यांनीच विवाह नोंदणी केली आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात सर्वाधिक १३६४, तर धारणी तालुक्यात सर्वात कमी केवळ ९ विवाहाची नोंद झालेली आहे. यावरून विवाह नोंदणीसंदर्भात नागरिकांची उदासीनता दिसून येत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे यंदा गर्दी वा संपर्क टाळण्याच्या उद्देशाने अनेक विवाहास इच्छुक असलेल्यांनी पुढे बघू, अशी भूमिका घेतल्याचे दिसून आले असले तरी अनेकांनी बजेटमध्ये कोरोना नियमाच्या अधीन राहून हा विधी उरकविल्याचे चित्र आहे. मात्र, विवाहन नोंदणीची तसदी कुणी घेताना दिसत नाही. शासकीय योजनेचा लाभ, इतर ठिकाणी आवश्यकता भासल्यासच विवाह नोंदणीचे कार्यालय कुठे आहे, याची मिळेल त्यांना विचारणा करताना मात्र दिसतात. परंतु विवाहानंतर नोंदणीची तसदी घेत नसल्याचे वास्तव सर्वेक्षणातून समोर आले आहे. याला संबंधित विभागदेखील काऱणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. जानेवारी महिन्यात ६१७, फेब्रुवारी ५७२, मार्च ३२३, एप्रिल १८३, मे १६९, जून २५४, जुलै ४२६, ऑगस्ट ३०८, सप्टेंबर ५३४, ऑक्टोबर ४८०, नोव्हेंबर ३२७ विवाह नोंदणी झालेली आहे.
तालुकानिहाय विवाह नोंदणी
अचलपूर - ८६६
अमरावती - १३६४
अंजनगाव सुर्जी - ९१
चांदूर बाजार - ६४३
चांदूर रेल्वे - १५३
दर्यापूर - ७०
मोर्शी - २७७
वरूड - २१८
भातकुली - २३४
धामणगाव रेल्वे - १८९
तिवसा - १३०
नांदगाव खंडेश्वर - ५७
चिखलदरा - १४
धारणी - ९
कोट
विवाह नोंदणीकरिता दाम्पत्य अनुत्सुक दिसून येत आहे. शासनाने विविध योजनांच्या लाभासाठी विवाह नोंदणी अनिवार्य केल्यास हा टक्का वाढू शकतो.
- दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद