फोटो पी २८ धारणी शाळा
पंकज लायदे
धारणी : सर्व शाळा शिक्षकांच्या शंभर टक्के उपस्थितीत उघडण्याचे आदेश निघाल्यानंतर सोमवारी धारणी तालुक्यातील २१३ शाळांची दारे उघडली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणे अनिवार्य केले असले तरी मेळघाटातील शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण देणे अशक्यच असल्याचे निदर्शनात आले. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बासपाणी, धारणी व टिंगऱ्या येथे भेट दिली असता बासपाणी शाळेतील वर्ग १ ते ५ वीपर्यंत २०० आदिवासी विद्यार्थी ऑफलाईन शिक्षण घेत होते. परंतु सध्या ऑनलाइन शिक्षणासाठी त्यांच्याकडे व त्यांच्या पालकाकडे कोणतेही मोबाईलचे साधन नाही. त्यासोबत गावात इंटरनेट सुविधा नाही. टिंगऱ्या येथे वर्ग १ ते ७ वीपर्यंत १३५ विद्यार्थी ऑफलाईन शिक्षण घेत होते. ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी त्यांची पण तशीच परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही. इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही.
५०० विद्याथी ऑनलाईन
जिल्हा परिषद हायस्कूल धारणी येथे वर्ग ६ ते १२ वीपर्यंत ८५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. पैकी ५०० विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहे. त्याकरिता २३ कार्यरत शिक्षकांनी व्हाॅट्सॲप ग्रुप झूम ॲपवर शिक्षण देण्यास सुरूवात केली.
--------------------
फोटो पी २८ जावरे
चिखलदरा तालुक्यात केवळ शिक्षक
चिखलदरा : तालुक्यातील चौऱ्यामल, बिहाली, कोहाना, सलोना, गौलखेडा बाजार शाळांमध्ये शिक्षकांची हजेरी दिसली. मोबाईल नेटवर्क नसल्याने शिक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ऑफलाइन व ऑनलाइन शिकवण्यासाठी आदिवासी पाड्यातील शिक्षक मित्रांची मदत मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे.
-------------------------------
शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापिका अनुपस्थित
फोटो पी २८ चांदूर बाजार
चांदूर बाजार : शालेय सत्राच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील जी. आर. काबरा विद्यालयाच्या मुख्याध्यापिकाच अनुपस्थित होत्या. नगर परिषद उर्दू विद्यालय, जिजामाता विद्यालयासह शिरजगाव बंड येथील शाळेत शिक्षकांची १०० टक्के हजेरी असल्याचे दिसून आले. नगर परिषद उर्दू विद्यालयात २९ जूनपासून ऑनलाईन वर्ग सुरू होतील, असे मुख्याध्यापक जमील आफताब म्हणाले.
-------------------------------
शाळाही उघडली, पण घंटा वाजलीच नाही
नांदगाव खंडेश्वर : सोमवारी शाळा उघडली. गुरुजनांचीही हजेरी लावली, पण शाळेची घंटा वाजलीच नाही. विद्यार्थ्यांविना वर्गखोल्या ओस पडल्या होत्या. येथील नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी दुपारी १ वाजता फेरफटका मारला असता, या विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्याचे निदर्शनास आले. पहिल्या दिवशी शाळेत १०० टक्के शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे.
-------------------------------
वरूडमध्ये ऑनलाईन अभ्यासक्रमाला सुरुवात वरूड : शिक्षक शाळेत तर विद्यार्थी घरी अशा अवस्थेत शाळेचा पहिला दिवस ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या सुरू झाला असून शाळेत वाजणारी घंटी मोबाईलवर वाजली. शाळेचा पहिला दिवस आनंददायी वातावरणात शिक्षकांनी साजरा केला. मात्र विद्यार्थ्यांचा चिवचिवाट नसला तरी आभासी पद्धतीने शाळेची सुरुवात झाली. शहरातील शाळांत शिक्षकांनी १०० टक्के हजेरी लावून ऑनलाईन शिक्षणाला प्रारंभ केला.
-------------------------------
भूगावची शाळा पहिल्याच दिवशी लेट
फोटो पी २८ जावरे
परतवाडा : २८ जूनपासून विदर्भातील शाळांची घंटा विद्यार्थ्यांविना वाजली. मोजक्या शाळा वगळता ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ दिसून आला, तर शिक्षक शासनाने लादलेल्या वेगळ्याच कामात व्यस्त दिसून आले. सुबोध हायस्कूलमध्ये मात्र शिक्षक मुख्याध्यापक वृंद दहावीतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे गिरवत असल्याचे दिसून आले. परतवाडा अमरावती मार्गावरील भूगाव येथील आदर्श विद्यालय या शाळेत ११:१९ वाजता भेट दिली असता शाळेला, फाटकाला, मुख्याध्यापक कक्षाला कुलूप आढळून आले. शाळा ११ वाजता सुरू होते. त्यामुळे विद्यार्थी नसल्याने आम्हीसुद्धा याच वेळेला पोहोचतो, असे मुख्याध्यापक आर.के गादे यांनी सांगितले. तर, परतवाड्यातील सुबोध हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात १२:२२ वाजता भेट दिली असता, मुख्याध्यापक संजय चौबे, शिक्षक वैभव भारतीय एका वर्गखोलीत विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांना मोबाईलवर ऑनलाईन लिंक पाठविल्यानंतर धडे गिरवताना दिसून आले. शाळेत सॅनिटायझर फवारणी सुरू असल्याचे दिसून आले.
अचलपूर तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या शाळेत सर्वात मोठी माध्यमिक शाळा आहे. परकोटामध्ये असलेल्या या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत २२२ विद्यार्थी असून, सहा शिक्षक कार्यरत आहेत. पहिल्या दिवशी शंभर टक्के उपस्थिती होती. मुख्याध्यापक एन. एस. चव्हाण, उपस्थित होते. शाळा तपासणीसाठी पहिल्याच दिवशी केंद्रप्रमुख नीळकंठ दलाल शिक्षकांना शासन निर्णयासंदर्भात बोलताना दिसून आले. परंतु ऑनलाइन शिक्षणासंदर्भात २२२ पैकी केवळ ५० ते ६० विद्यार्थ्यांजवळच अँड्रॉइड मोबाईल असल्याने मुख्याध्यापकांनी सांगितले.