खामगाव : अमरावती विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी तसेच तालुक्यातील इतर विभागाचे तालुका अधिकारी यांनी काल १३ जून रोजीची रात्र अतिदुर्गम आदिवासी गाव चाळीसटापरी येथे काढली. या मुक्कामामुळे अधिकार्यांना अतिदुर्गम भागातील समस्या प्रत्यक्षात जाणून घेता आल्या व त्या सोडविण्याचा प्रयत्न झाला. राज्याचे मुख्य सचिव सहारिया यांच्या कल्पकतेतून वरिष्ठ अधिकार्यांनी दुर्गम भागात मुक्काम करुन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घ्याव्या व यंत्रणेला कामाला लावावे, या हेतूने नुकतीच एक अभिनव अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. यानुसार काल १३ जूनच्या रात्री अधिकार्यांनी प्रत्यक्षात ही संकल्पना राबविली. यासाठी विभागीय आयुक्त डी.आर.बनसोड यांच्या आदेशानुसार जळगाव जा.तालुक्यातील अतिदुर्गम आडवळणाच्या जळगाव जा. या शहरापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या चाळीसटापरी या १00 टक्के आदिवासी वस्ती वजा गावाची निवड करण्यात आली. संध्याकाळी विभागीय आयुक्त डी.आर.बनसोड, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उपविभागीय अधिकारी दिनेशचंद्र वानखडे, तहसीलदार चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी गुजेला यांच्यासह इतर विभागीय तालुका अधिकारी असा अधिकार्यांचा ताफा गावात दाखल होताच आदिवासींनी त्यांच्या पारंपारिक पध्दतीनुसार या अधिकार्यांचे स्वागत केले. त्यानंतर अधिकार्यांनी ग्रामस्थांमध्ये मिसळून आपुलकीने त्यांच्याशी वार्तालाप केला. त्यानंतर रात्री विजेची व्यवस्था नसल्याने सौरदिव्यांच्या प्रकाशात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी त्यांना उद्भवत असलेल्या समस्यांसोबतच राशन कार्ड मिळणे, मतदार यादीत नावनोंदणी, वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे, आदी मागण्या अधिकार्यांसमोर मांडल्या असता येत्या एक महिन्यात राशन कार्ड बनवून देण्याचे तसेच सुरु असलेल्या मतदार नोंदणी मोहीम अंतर्गत मतदार नोंदणी करण्याचे निर्देश यावेळी संबंधित अधिकार्यांना देण्यात आले. तर वनजमिनीबाबत पट्टे देण्याचा विषय तांत्रिक अडचण असल्याने सोडविण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले. भिंगारा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या चाळीसटापरी येथील या ग्रामसभेला भिंगारा व कहुपट्टा येथील आदिवासी बांधव व भगिनी उपस्थित होत्या. यानंतर विभागीय आयुक्त डी.आर.बनसोड यांच्यासह जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर व इतर अधिकार्यांनी आदिवासींनी तयार केलेले मिसळचे वरण व मक्याची भाकरी असे आदिवासींसोबत सहभोजन घेतले. तर रात्री आदिवासींच्या झोपडीतच मुक्काम केला. तर आज १४ जून रोजी सकाळी भिंगारा या आदिवासी गावात जावून तेथील समस्या जाणून घेतल्या. या दौर्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे सहकार्य लाभले. पूर्वीच्यावेळी राजे महाराजे आपल्या प्रजेमध्ये राजा म्हणून न जाता तेथील समस्या जाणून घेत त्याच धर्तीवर राबविण्यात येणार्या या ह्यअधिकार्यांचा मुक्काम ग्रामीण भागातह्ण या संकल्पनेमुळे शासनासोबतच प्रशासन सुध्दा आपल्या समस्यांबाबत जागृत असल्याची भावना आदिवासींमध्ये निर्माण झाली. अधिकारी आपल्या गावात आल्याचा त्यांना आनंद झाला होता.
अधिकार्यांनी काढली दुर्गम भागात रात्र !
By admin | Updated: June 15, 2014 01:21 IST