शिक्षण मंडळाचे पत्र : शिक्षण विभागामार्फत कारवाई सुरूलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : इयत्ता नववीच्या सर्वच विषयांचा अभ्यासक्रम पुनर्रचित करून विषय योजना तसेच मूल्यमापन योजनेत बदल करण्यात आला. त्याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. नववीचा अभ्यासक्रम बदलल्या बाबतच्या सूचना सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. यंदा प्रथमच नववीच्या अभ्यासक्रमामध्ये व्यक्तिमत्त्व विकास, कार्यानुभव, समाजसेवा व व्यवसाय मार्गदर्शन विषयाऐवजी विकास व कलारसास्वाद विषयाचा समावेश करण्यात आला आहे.नववीचा अभ्यासक्रम बदलल्याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी शिक्षणाधिकारी यांना पत्र पाठविले. इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) हा विषय स्वतंत्र न राहता आयसीटीचा सर्वच विषयांमधून अंतर्भाव करण्यात आला आहे. सामान्य गणित हा विषय न ठेवता बीजगणित व भूमिती ही पुस्तके राहतील व सामाजिकशास्त्र विषयांतर्गंत भूगोल विषयाबरोबरच अर्थशास्त्राचासुद्धा समावेश केला आहे. तसेच यंदा प्रथमच व्यक्तिमत्त्व विकास, कार्यानुभव, समाजसेवा व व्यवसाय मार्गदर्शन विषयाऐवजी नववीच्या विद्यार्थ्यांना आरोग्य व शारीरिक शिक्षण स्व विकास व कलारसास्वाद विषय शिकविला जाणार आहे. शालेय प्रमाणपत्र विषयात संरक्षणशास्त्र हा विषय राहणार आहे. या विषयाला एमसीसी स्काऊट गाईड, नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा, एनसीसी हे विषय पर्याय म्हणून राहतील. यासोबतच शिक्षण व्यवसायाभिमुख व्हावे, यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत एनएसक्यूएफचे इयत्ता नववी, दहावीच्या स्तरावर एकूण दहा विषय सुरू करण्यात आले आहेत. हे विषय शासन आदेशानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना द्वितीय किंवा तृतीय भाषा आणि सामाजिक शास्त्रे विषयाला पर्याय म्हणून निवडता येतील आदी बदल नववीच्या अभ्यासक्रमात करण्यात आले आहेत. इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात पुढील वर्षात बदल करण्यात येणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी स्पष्ट केले आहे.
नववीच्या अभ्यासक्रमात बदलाच्या शाळांना सूचना
By admin | Updated: June 9, 2017 00:23 IST