काँग्रेसच्या कोट्याला सुरूंग : संपर्कमंत्र्यांनी पाठविला अहवालगणेश वासनिक - अमरावतीराष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचलपूर मतदारसंघ ताब्यात घेण्याची तयारी चालविली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे जिल्हा संपर्क मंत्री अनिल देशमुख यांनी वरिष्ठांकडे अहवाल पाठविला असून या मतदारसंघाला ‘प्रायोरिटी’ देण्याचे कळविले आहे. राष्ट्रवादीची ही खेळी म्हणजे काँग्रेसच्या कोट्याला सुरुंग लावण्याचे राजकीय गणित मानले जात आहे.काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बुधवारी बैठक झाली. या संयुक्त बैठकीत महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीने काही दिवसांपासून दिलेली ‘एकला चलो’ची हाक हवेत विरली आहे. मात्र, आघाडीला काही बंधने पाळावी लागतील. त्यासाठी काही निकष ठरविण्यात आले आहेत. ज्या मतदार संघात सलग दोन वेळा पराभव झाला आहे, अशा मतदारसंघात मित्रपक्षाने निवडणूक लढविण्याची मागणी केल्यास तो मतदारसंघ त्या पक्षाला सोडावा लागेल. या निकषानुसार अचलपूर मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केल्यास काँग्रेसला तो सोडावा लागेल. अचलपूर विधानसभा मतदारसंघात सलग दोन वेळा काँग्रेसच्या वसुधाताई देशमुख यांना पराभवाचा सामना करावा लागला. होता. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने अचलपूर विधानसभा मतदारसंघ लढविण्याची तयारी चालविली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे दौरे, विकासकामांचा सपाटा आणि मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदाच अचलपूर मतदारसंघाची मागणी राष्ट्रवादीने जोरकसपणे मांडली आहे. आघाडीचे नेते या मतदारसंघाबाबत कोणता निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीयदृष्ट्या या मतदारसंघावर काँग्रेस विचारसरणीचा प्रभाव असल्याचा इतिहास आहे. मात्र, अंतर्गत हेवेदावे, शह-काटशहाच्या राजकारणाने काँग्रेस उमेदवारांची ‘फिल्डिंग’ लावून त्यांना पराभवाच्या खाईत लोटण्याचे काम या मतदारसंघात दहा वर्षांपासून सुरु असल्याचे चित्र आहे. हा मतदारसंघ पूर्णत: ग्रामीण भागाशी जोडण्यात आला आहे. अचलपूर व चांदूरबाजार तालुक्याचा समावेश असलेला अचलपूर मतदारसंघ सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आहे. अचलपुरला जिल्ह्याचा दर्जा मिळावा, ही मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. दरवेळी निवडणूक आली की, अचलपूर जिल्हा निर्मितीचा मुद्दा ऐरणीवर येतो. मात्र, अद्यापपर्यंत याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. या मतदारसंघात अनेक प्रश्न आणि समस्या आहेत. पण, त्या कधी सुटणार? हा गंभीर प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे. नागरिकांच्या भेटीगाठी, संपर्क, अडीअडचणी, सुख-दु:खात धावून जाणे सुरू झाले आहे. या मतदारसंघात पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांचे नेते पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेल्याचे अनुभवास आले. संकटकाळी मदत करणे, ही अमरावती जिल्ह्याची संस्कृती असली तरी निवडणूक आल्यानंतर एकमेकांचे पाय कसे ओढता येतील, यासाठीसुद्धा हा जिल्हा चर्चेत येणाऱ्यांपैकी आहे. त्यामुळेच काही वर्षांपासून अचलपूर मतदारसंघावर डोळा ठेवून असलेल्या राष्ट्रवादीने संधी मिळताच हा मतदारसंघ ताब्यात घेण्याची रणनीती आखली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यासाठी जोमाने हालचालीही सुरू केल्या आहेत. अचलपूर मतदारसंघावरुन आघाडीत बरेच राजकारण होण्याची शक्यता आहे. परंपरागत काँग्रेसच्या वाट्याला असलेला अचलपूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस सहजासहजी सोडणार काय, हेसुद्धा कोडेच आहे.
राष्ट्रवादीच्या यादीत ‘अचलपूर’
By admin | Updated: August 7, 2014 23:41 IST