नांदगाव खंडेश्वर : प्रशासनातील कामकाज सुलभ व पारदर्शक आणि गतिमान होण्यासाठी २८ डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीत‘स्वच्छ प्रशासन’ अभियान राबविण्यात आले. या अभियानात कार्यालयीन कामकाजाचा जास्त वेळ खर्ची न जावा, यासाठी ९ व १० जानेवारी या सुटीच्या दिवशीही हे अभियान राबविण्यात आले.
अभियानात कर्मचाऱ्यांची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणे, अभिलेखे वर्गीकरण, निर्लेखन, कार्यालयीन स्वच्छता व सुव्यवस्था, दप्तराची मांडणी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, संकीर्ण, पदोन्नतीची प्रकरणे, जात प्रमाणपत्र पडताळणी, सेवानिवृत्ती प्रलंबित प्रकरणे निकाली काढून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन प्रकरणे सेवानिवृत्ती दिनांकाच्या २४ महिन्यांपूर्वी तयार करणे आदी बाबींचा या अभियानात समावेश होता.
हे अभियान गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. यात प्रीतम चर्जन, ज्योती अडसोड, मंगेश मानकर, किशोर उडाखे, रत्नाकर मुळे, शंकर कवाडे, महेंद्र झिमटे, परवेज खान, दिलीप चोरे, मनीष देशमुख, विजया गवळी, संदीप डोफे, पुरुषोत्तम डोफे, रीतेश कोठेकर, गजानन देऊळकर, मनीष मदनकर, सूर्यकांत बनकर, सुनील गोळे व इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
---------