अमरावती : पैशाच्या देवाण-घेवाणीतून महिलेला पेटवून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. येथील जिल्हा व सत्र न्यायधिश श्रीकांत अणेकर यांच्या न्यायालयाने गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. मोहन जयराम मसुले (३७, रा. शहापूर पुनर्वसन, वरुड) असे शिक्षा प्राप्त आरोपीचे नाव आहे.मोहन मसुले व चंद्रकला छत्तेसिंग कुंभरे (४७, रा. शहापूर पुनर्वसन) हे दोघे सोबत कॅटरींगचा व्यवसाय करीत होते. त्यांचा या व्यवसायात पैशांच्या देवाण-घेवाणीतून वाद झाला होता. १० मे २०१२ रोजी मोहन मसुले हा चंद्रकला यांच्या घरी आला. त्याने पैशांच्या कारणावरुन चंद्रकला यांच्याशी पुन्हा शाब्दिक वाद घातला. हा वाद विकोपाला गेला आणि मोहनने चंद्रकला यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये त्या ९१ टक्के भाजल्या गेल्या. त्यांना प्रथमोपचारासाठी वरुड येथील रुग्णालयात व प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोहन मसुले याने पैशाच्या कारणावरुन पेटवून दिल्याचे मृत्युपूर्व बयान चंद्रकला यांनी इर्विन पोलीस चौकीत नोंदविले होते. याप्रकरणी वरुड पोलिसांनी आरोपी मोहन मसुले यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. याघटनेचे दोषारोपपत्र उपनिरीक्षक एस. ए. बागुल यांनी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. श्रीकांत अणेकर यांच्या न्यायालयात दाखल केले. याप्रकरणी दहा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद एकुण अणेकर यांनी आरोपी मोहन मसुले याला हत्येप्रकरणी जन्मठेप, ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाकडून वकिल प्रकाश शेळके यांनी प्रभावी युक्तीवाद केला.
महिलेची हत्या, आरोपीला जन्मठेप
By admin | Updated: September 18, 2014 23:28 IST