फोटो पी ०९ नांदगाव पेठ
नांदगाव पेठ : लॉकडाऊन विरोधात असलेल्या व्यावसायिकांनी लॉकडाऊन मागे न घेतल्यास ९ एप्रिलपासून दुकाने उघडण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. त्यानुसार, बिझिलँडमध्ये दुकाने उघडणार म्हणून हजारो कामगार शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून दाखल झाले होते. मात्र, प्रशासनाने वेळीच कठोर भूमिका घेतल्याने कामगारांना आल्यापावली घरी परतावे लागले. शटर बंद करून व्यवसाय करणाऱ्या दोन दुकानांना तहसीलदार संतोष काकडे यांनी १५ हजारांचा दंड ठोठावला.
शुक्रवारी दीड हजार कामगार बिझिलँडमध्ये कामावर आले. मात्र, याची माहिती ग्रामविकास अधिकारी जयश्री गजभिये यांना मिळताच त्या तातडीने बिझिलँडमध्ये पोहचल्या. परिस्थितीची माहिती तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना दिली. काही वेळातच तहसीलदार संतोष काकडे, मंडळ अधिकारी विशाल धोटे, पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर ताफ्यासह दाखल झाले. यावेळी कंचिता साडी सेंटर व सुमित क्रियेशन ही दुकाने शटर बंद करून सुरू असल्याचे तहसीलदार काकडे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तातडीने दोन्ही दुकानांतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून संचालकांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा दंड बजावला. पोलीस ताफ्याने बिझिलँडमधील सर्व कामगारांना वाहनांसह बाहेर काढून शासनाच्या निर्देशांचे पालन करण्यास बजावले.
बॉक्स
महामार्गावर कामगारांची गर्दी
कोविडपासून बचावासाठी शासनाने केलेल्या निर्देशांना बिझिलँडमध्ये पायदळी तुडविण्यात आले. कामगारांना घरी परतण्यास सांगितले तेव्हा महामार्गावर दीड हजार कामगारांची गर्दी जमली होती. काहीवेळ मार्गावरील वाहतूक खोळंबली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र यावेळी स्पष्ट झाले.