अमरावती : एका व्यापाऱ्याला लुटणाऱ्या दोन सराईत बदमाशांना रविवारी पोलिसांनी मुंबई येथून अटक केली. शहर कोतवाली पोलिसांनी ही प्रशंसनीय कामगिरी केली. अनिल तुळशीराम जोशी (३५, रा.शांतीनगर, मास्तरवाडी, मढ आयलंड, मालाड वेस्ट मुंबई) व प्रमोद रामकैलास त्रिपाठी (४२, रा. साईप्रिया अपार्टमेंट, सहकारनगर, विरार इस्ट, जि.पालघर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक लॅपटॉप जप्त केला आहे.मसानगंज येथील रहिवासी पंकज प्रेमचंद गुप्ता (३७) यांचे बसस्थानक मार्गावर कॅम्प्युटर, लॅपटॉप विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या भ्रमणध्वनीवर १६ जून रोजी अनिल जोशी नामक इसमाने संपर्क साधला. अमरावती जिल्ह्यात प्रोजेक्ट सुरु आहे. आमचे बॉस अमरावतीत येत आहे. ते गर्ल्स हायस्कूल चौकातील एका आलीशान हॉटेलमध्ये थांबणार आहेत. त्यामुळे आम्हाला काही लॅपटॉप विकत द्या, अशी बतावणी त्याने केली. १७ जून रोजी जोशीने पुन्हा गुप्ता यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. बॉस अमरावतीत दाखल झाले असून ते हॉटेलमधील रुम क्रमांक १२१ मध्ये थांबल्याची माहिती त्याने दिली. गुप्ता यांनी दुकानातील कार्यकारी अभियंता सुनील डरंगे यांना तीन महागडे लॅपटॉप घेऊन हॉटेलमध्ये पाठविले. बॉसला लॅपटॉप दाखवितो. तुम्ही रुममध्ये बसा, असे म्हणून जोशी हॉटेलमधील इंटरकनेक्ट असणाऱ्या रुममध्ये गेला. तेथून त्रिपाठी व जोशी यांनी जवळपास ८० लाख रुपयांचे तीन लॅपटॉप घेऊन पळ काढला. फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास येताच याची तक्रार पंकज गुप्ता यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अनिल जोशी व प्रमोद त्रिपाठी यांच्याविरुद्ध अफरातफर करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविला. तांत्रिक पद्धतीने तपास करुन पोलिसांनी दोन्ही आरोपींना मुंबईतून अटक केली. ही प्रशंसनीय कामगिरी शहर कोतवालीचे पोलीस निरीक्षक दिलीप इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे, अजय गाडेकर, अनिल निर्मळ यांनी केली. आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
व्यापाऱ्याला लुटणारे चोरटे मुंबईतून जेरबंद
By admin | Updated: August 31, 2014 23:29 IST