जगदीश नाना बोंडे : आठवणींचे वादळअमरावती : १९८६ च्या डिसेंबरमधील गोष्ट. ७ ते १२ डिसेंबरपर्यंत शरद जोशींनी आंदोलनाची हाक दिली. कापसासाठी लाखो पोशिंदे रस्त्यावर उतरले. राज्याच्या विविध ठिकाणची कारागृहे शेतकरी, शेतमजुरांनी हाऊसफुल्ल झाली. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त. मुंगीलाही पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल, अशी स्थिती. वर्धा जिल्ह्यातील वरूड रेल्वे स्टेशन ‘लामबंद’! सारे काही झुगारून गनिमी काव्याने तब्बल ४० हजार लोक १२ डिसेंबरला येथे पोहोचले. आता पोलीस लाठीमार करणार, अशी स्थिती. अंगावर काटाही उमटला. मात्र साहेबांच्या नेतृत्वापुढे नमते घेऊन सर्वांनाच जेलमध्ये टाकण्यात आले आणि त्या दिवसापासून शरद जोशींशी वैचारीक संबंध जुळलेत ते आजतागायत. शरद जोशींच्या खांद्याला खांदा लावून अमरावती तथा विदर्भाचे नेतृत्व म्हणून पुढे आलेले जगदिश नाना बोंडे सांगत होते. त्यांच्या आठवणींचे वादळच इतके व्यापक की ते शमतच नाही.‘शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळविणे, हा माझा श्रमसिद्ध हक्क आहे’, अशी हृदयभेदी घोषणा शरद जोशी यांनी १९८४ ला अमरावतीमध्ये झालेल्या लाखोंच्या सभेत केली. त्यानंतर शेतीचे अर्थकारण समजायला लागले, अशी आठवणही शेतकरी संघटनेचे विदर्भप्रमुख असलेल्या जगदीश नाना बोंडे यांनी सांगितली. (प्रतिनिधी)
तुरुंगातही मावेना कार्यकर्ते
By admin | Updated: December 13, 2015 00:14 IST