अमरावती : शहरातील पथदिवे देखभाल, दुरूस्तीचा कंत्राट १५ वर्षांपासून एकाच व्यक्तीकडे असून या कंत्राटात बरेच गौडबंगाल दडल्याचा संशय लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच प्रस्ताव क्रं. ४५,४६ अन्वये या विषयावर १७ जून रोजी वादळ उठण्याची शक्यता आहे.येथील मे.ब्राईट इलेक्ट्रीकल वर्क्स यांच्याकडे पथदिवे, देखभाल दुरूस्तीचा कंत्राट सोपविण्यात आला आहे. पथदिवे, देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी वर्षाकाठी दीड कोटी रूपये प्रशासनाला मोजावे लागते. मात्र हा कंत्राट नियमानुसार खरचं सुरू आहे काय? हे शोधून काढणे मोठे आव्हान आहे. या कंत्राटदारांचे अनेक वाहने बंद असून त्यांच्यावर प्रकाश विभागामार्फत कोणतीही कारवाई नाही. १८ वाहने कार्यरत असल्याचे कागदोपत्री दाखविण्यामागे कंत्राटदारांसोबत अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबध असल्याचे स्पष्ट होते. पथदिवे बंद असल्याची तक्रार दिल्यानंतर तीन दिवसांत ते पथदिवे सुरू करणे हे कंत्राटदारांचे कर्तव्य आहे. मात्र महिनाभर पथदिवे सुरू होत नसल्याचा आरोप हमीद शद्दा व भूषण बनसोड यांनी केला. अनेक पथदिवे बंद असताना दरमहा १७ ते १८ लाख रुपयांचे देयके मंजुरीसाठी पाठविण्यामागे कुणाचे षडयंत्र, असा सवाल उपस्थित होत आहे. नागरी वस्त्यांमधील बंद पथदिवे शोधून काढण्याची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात आली. ज्या पथदिव्यांची तक्रार आल्यास तेच पथदिवे सुरू केले जाते, असा अफलातून कारभार कंत्राटदाराचा आहे. या कंत्राटदारावर अधिकाऱ्यांचे नियंत्रण सुटल्याने पथदिवे देखभाल, दुरूस्तीचा कारभार रामभरोसे सुरू आहे. प्रभागनिहाय कंत्राटदारांची वाहनांची संख्या आणि झालेल्या कामांच्या नोंदीबाबतही प्रश्नचिन्ह आहे. अनेक वाहने गायब असताना याकडे दुर्लक्ष आहे. कंत्राटदारांच्या कामांची दैनदिन नोंद असणे गरजेचे आहे. मात्र पथदिवे, दुरुस्तीबाबत नोंद करण्यात आली नाही, यामागे बरेच काही दडले असल्याचे बोलले जाते. (क्रमश:)
महापालिकेच्या प्रकाश विभागात दिव्याखाली अंधार
By admin | Updated: June 16, 2014 23:16 IST