अमरावती : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महापौरपदासाठी महिला सदस्यांची लांबलचक यादी आहे. परंतु यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीत झालेल्या आपसी करारानुसार महापौर पद हे राष्ट्रवादीकडे तर उपमहापौरपद हे काँग्रेसच्या वाट्याला जाण्याचे संकेत आहे. महापौर पदाची निवडणूक ही विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिने अतिशय महत्वाची असली तरी काँग्रेसचे स्थानिक नेते कोणताही वाद न उद्भवता ही निवडणूक आटोपण्याच्या सकारात्मक निर्णयापर्यत पोहचले आहे. महापौर पद काँग्रेसला सहजतेने काही मित्रपक्षाच्या सहकार्याने खेचून आणता येते. परंतु भानगड , राजी- नाराजी कशाला घ्यायची. त्यापेक्षा याअगोदर ठरल्याप्रमाणे मित्र पक्षाला महापौर पद देवून सारे काही ‘आॅलवेल’ करण्याची रणनिती काँग्रेसने आखली असल्याची माहिती आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस दोन पावले मागे सरकण्याच्या तयारीत असताना संजय खोडके गटाच्या वर्चस्वातील राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट गटाला महापौर पद सहजतेने मिळेल, हे काही सद्या दिसून येत नाही. २३ सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादीत १३ सदस्य संजय खोडके यांच्या बाजुने तर ७ सदस्य हे राष्ट्रवादी पक्षासोबत आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील काळे यांना पक्षाने घोषीत केलेले गटनेता पद संपुष्टात आणले आहे. यापूर्वीचे अविनाश मार्डीकर यांनाच गटनेतेपदी न्यायालयाने कायम ठेवल्याने महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादी गटनेता पदाचा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सुनील काळे हे राष्ट्रवादी पक्षाकडून सवौच्च न्यायालयाची पायरी गाठण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीपूर्वी राकाँच्या गटनेता पदाबाबत सर्वाेच्च न्यायालयातून काही आदेश प्राप्त झाल्यास या निवडणुकीवर गंडातर येण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात महापौरपदाची निवडणूक होणार असल्याने संजय खोडके यांनी यापदावर कब्जा मिळविण्याची तयारी चालविली आहे. आ. रावसाहेब शेखावत आणि संजय खोडके यांच्यात महापौरपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब केला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या ७ सदस्यांना संजय खोडके यांचे नेतृत्व अमान्य असल्याने महापौर पदाच्या निवडणुकीसाठी काहीतरी वेगळे करण्याची शक्कल हे सदस्य लढवित असल्याचे सुत्रांनी सांगितले. एवढेच नव्हे तर उच्च न्यायालयाने गटनेता पदाबाबत दिलेल्या निकालाने महापालिकेत राष्ट्रवादीची नामुष्की झाल्याची बाब थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यत पोहचविण्यात आली आहे. महापालिकेत खोडकेंची सरशी झाल्याने अजित पवारही तिळपापड झाले असून त्यांना धडा शिक वण्यासाठी गटनेता पदाचे प्रकरण आता सवौच्च न्यायालयात पोहचणार असल्याचे बोलले जात आहे. ९ सप्टेंबर पूर्वी महापौर पदाच्या निवडणुकीसाठी सवौच्च न्यायालयातून काही आदेश आले तर महापालिकेत पुन्हा नव्या राजकारणाला प्रारंभ होईल, असे राजकीय चित्र आहे.
महापौर निवडणुकीत विधानसभेचे गणित
By admin | Updated: August 30, 2014 23:21 IST