दुर्लक्ष : व्यापारी, शेतकरी, कष्टकऱ्यांचे आरोग्य धोक्यात
वरूड : बाजार समितीच्या संत्रा लिलाव मंडईत सडलेली संत्री, केरकचरा पडला असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी, शेतकरी, व्यापारी, मजुरांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष असल्याची ओरड आहे.
बाजार समितीच्या संत्रा लिलाव मंडईत दिवसागणिक शेकडो ट्रक संत्रा परप्रांतात पाठविला जातो. शेकडो मजूर तेथे काम करतात. येथील हमाल भवनाशेजारी कचऱ्याचा ढीग पडला असून ते अडगळीत पडले आहे. खराब संत्री फेकून दिली जात असल्याने मजुरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. बाजार समिती समस्यांचे माहेरघर बनली आहे. बाजार समितीत ३० ते ३५ संत्रा मंडी आहे. येथे लिलाव बाजारसुद्धा भरतो. परंतु शेतकऱ्यांकरिता असणाऱ्या सुविधा धूळखात पडल्या आहेत. व्यापाऱ्यांना दुकाने दिली आहेत. शेतकरी भवन केवळ खासगी आणि सरकारी कार्यक्रमाकरिता असल्याचे चित्र आहे. येथील संत्रा मंडईत काम करणारे हजारो मजूर उघड्यावर वास्तव्य करतात. हमालाकरिता असलेले हमाल भवन दुर्गंधीचे आश्रयस्थान बनले आहे. सडलेल्या संत्र्यांचा ढीग येथे लागला आहे. कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी खरेदी करताना व्यापाऱ्यांचे हित जोपासले जाते.
कुणी ‘ब्र’ही काढत नाही
बाजार समितीच्या कार्यकारी मंडळात सर्वच पक्षाचे संचालक असले तरी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलण्यास कुणीही तयार नाही. यामुळे सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असल्याची ओरड आहे. घाणीचे साम्राज्य व सडक्या संत्र्यांचा दुर्गंध सभापती वा संचालकांच्या नाकापर्यंत अद्याप पोहोचलेला नाही.