स्थानिक युवक रोजगारापासून वंचित
शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला
मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : आपल्या मुलांना तालुक्यात येणाऱ्या उद्योगात नोकरी मिळेल, त्यांचे भविष्य सुखात जाईल, या आशेने २७ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी ७५ हेक्टर जमीन जळगाव आर्वी एमआयडीसीला दिली. मात्र, जवाहर सहकारी सूतगिरणी वगळता एकही मोठा उद्योग येथे आला नाही. येथील आठ ते दहा प्लाॅट दलालांच्या घशात अडकल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
नागपूर- मुंबई मध्य रेल्वेमार्गावर शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर तीन हजार लोकवस्तीचे जळगाव आर्वी गाव आहे. तेथे सार्वजनिक ई-क्लास जमीन आहे. २७ वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ ९९.३३ हेक्टर जमीन उद्योगांसाठी संपादित केली. गावात उद्योग आल्यास आपल्या मुलांना नोकरी मिळेल, या आशेने या परिसरातील शेतकऱ्यांनी अल्प किमतीत ७५ हेक्टर जमीन या उद्योग मंडळात दिली यात ३२ हजार स्क्वेअर मीटर मध्ये येथे जवाहर सहकारी सूतगिरणी यांनी आपला उद्योग सुरू केला जवाहर सहकारी सूतगिरणीचे मार्गदर्शक दत्ता मेघे, अध्यक्ष सागर मेघे, उपाध्यक्ष विजय उगले यांच्या पुढाकारामुळे या भागात शेतकऱ्यांचे मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना अशा जवळपास १४०० जणांना रोजगार मिळाला. मात्र, उर्वरित जमिनीत उद्योग येण्याऐवजी दलालांनी आपल्या घशात टाकल्याचे चित्र आहे.
रोजगाराची स्थिती बिकट
धामणगाव तालुक्याची लोकसंख्या १ लाख ४४,५८९ आहे. दरवर्षी माध्यमिक शाळेतून आठशेच्या वर विद्यार्थी उत्तीर्ण होतात कनिष्ठ महाविद्यालयातनू सातशे विद्यार्थी पुढील शिक्षण घेतात आयटीआय मधून प्रमाणपत्र घेऊन तीनशे विद्यार्थी बाहेर पडतात पदवीधरांची संख्या दरवर्षी दोनशेच्या आकड्याने वाढत आहे. बीएड, कृषी पदवीधारक त्यांची संख्या वर्षाला ८५ च्या आकड्याने वाढत आहे. सात वर्षात केवळ ३७ युवकांना शासकीय नोकरी मिळाली आहे. दरवर्षी बेरोजगारीच्या टक्केवारीत वाढ होत आहे. व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या एक टक्का शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना पुण्या मुंबईत नोकरी मिळाली मात्र बी.एड., एम.एस्सी. या पदवीधारकांना नोकरी मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. बेरोजगारांना शिक्षणाचा फायदा व्हावा स्वतःच्या पायावर उभे राहावे म्हणून शासनाने काही योजना अमलात आणल्यात. परंतु तालुक्यात या योजनेचा बोजवारा उडाला आहे. श्रावणबाळ अर्थ सहाय्य योजनेतून वृद्धांना महिन्याकाठी एक हजार मिळते. परंतु लाख रुपये शिक्षणासाठी खर्च करून रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही, ही तालुक्याची वस्तुस्थिती आहे.
प्राथमिक करारनाम्याने केला घात
औद्योगिक महामंडळ यांनी संपादित केलेल्या जमिनीतील प्लांट मिळण्यासाठी प्रथम अर्ज करावा लागतो. येथील प्लाॅट प्राप्त झाल्यानंतर पाच वर्षांचा प्राथमिक करारनामा करण्यात येतो. ज्या गरजूंनी येथे प्लॉट घेतला, त्या प्लॉटवर बांधकाम सुरू असल्याचे लेखी करारनामा दिले. मात्र, तेथे कोणतेही काम सुरू नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या भागातील बेरोजगारांना व गरजूंना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या दराप्रमाणे उपलब्ध जागा करून देण्याची मागणी जळगाव आर्वी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.