कर्मचारी, रूग्णांना बाधेचा धोका : संसर्गजन्य आजाराने ग्रासलेल्या रूग्णांचा मुक्त वावरवैभव बाबरेकर अमरावतीजिल्ह्याभरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणारे इर्विन रुग्णालय सद्यस्थितीत संसर्गजन्य आजारांच्या उत्पत्तीचे केंद्र बनले आहे. संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांचा खुला वावर या रूग्णालयात दाखल इतर रूग्ण तसेच रूग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. याकडे आरोग्य प्रशासनाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसते.जिल्ह्याच्या सीमा दिवसेंदिवस विस्तारत आहेत. राज्यभरातून रोजगारासाठी येथे येणाऱ्या लोकांमुळे लोकवस्ती दाट होत चालली आहे. प्रत्येकालाच शहरात हक्काचा निवारा मिळत नाही. घरे भाड्याने घेण्याची प्रत्येकाचीच कुवत नसते. त्यामुळे कित्येक लोक उघड्यावरच बस्तान मांडतात. शहरातील रेल्वे स्थानक, बसस्थानकासह अलीकडे शासकीय रुग्णालयदेखील भिकाऱ्यांचे आश्रयस्थान बनल्याचे दिसते.जिल्हा सामान्य रूग्णालयात मोफतचे अन्न आणि बिनभाड्याचा निवारा मिळत असल्याने हजारो गोरगरीब रुग्ण उपचाराच्या नावाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होतात. यातील अनेक जण विविध प्राणघातक संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेले असतात. टी.बी. आणि त्वचारोगांनी ग्रासलेल्या रूग्णांची संख्या यामध्ये अधिक असते. संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेले हे रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या परिसरात व आतील वॉर्डांमध्येसुध्दा बिनधास्त अनिर्बंध फिरत असतात. त्यामुळे रूग्णालयात इतर आजारांवरील उपचारांसाठी दाखल रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आणि येथील कर्मचाऱ्यांनाही घातक संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेले हे मोकाट रूग्ण रुग्णालय परिसरातच थुंकतात. येथेच सर्रास मलमूत्र विसर्जनही केले जाते. काही रुग्ण अंगावरील जखमा खुल्या ठेवून फिरतात. त्यामुुळे वातावरणात रोगजंतुंचा फैलाव होतो. ही बाब सुदृढ रूग्णांसाठीदेखील अत्यंत धोकादायक ठरू शकते. रूग्णालय प्रशासनाने संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांच्या मुक्तसंचारावर तत्काळ निर्बंध घालण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यातरुग्णालय परिसरात भटकंती करणाऱ्या संसर्गजन्य आजारांनी बाधित रूग्णांना डॉक्टर आणि परिचारिका कंटाळल्या आहेत. ओपीडीपासून प्रत्येक वॉर्डापर्यंत सगळीकडे या रूग्णांचा बिनधास्त वावर आहे. सावधगिरी म्हणून काही डॉक्टर व नर्सेस मास्क लावून उपचार करतात. मात्र, एखादवेळी ही सावधगिरी न बाळगल्यास संसर्गजन्य आजारांची बाधा होऊ शकते. सहा महिन्यांत ४० बेघरांवर उपचारजिल्ह्यातील अनाथ व बेघर रूग्णांच्या उपचाराची सोय जिल्हा सामान्य रूग्णालयात केली जाते. पोलीस, सामाजिक संघटना व नागरिकांच्या सहकार्याने दाखल या रूग्णांवर उत्तम उपचार केले जातात. मात्र, आजारातून उठल्यानंतरही हे रूग्ण रूग्णालय परिसरातच तळ ठोकून राहतात. काही रूग्णांना त्यांच्या नातलगांच्या स्वाधीन करण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र, संसर्गजन्य आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांना घरी नेण्यास अनेकदा नातलगही तयार होत नाहीत.
‘इर्विन’ रूग्णालय बनले आजार उत्पत्ती केंद्र
By admin | Updated: July 14, 2014 00:38 IST