अमरावती : सिंचन प्रकल्पाचा शेतकरी बांधवांना लाभ मिळून सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिकाधिक पाणीवापर संस्थांना चालना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंपदा अभियंत्यांनी इतर विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यात व्यापक मोहीम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामांबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख, कार्यकारी अभियंता श्रीकांत उमप, सुनील राठी व उपअभियंता उपस्थित होते.
जिल्ह्यात कार्यरत पाणीवापर संस्थांचे प्रमाण अत्यल्प आहे. ते सर्वप्रथम वाढविणे क्रमप्राप्त आहे. सर्वत्र पाटचाऱ्या निर्माण होऊन सिंचनक्षमता वाढविणे आवश्यक आहे. ही कामे ‘मिशनमोड’वर केल्याशिवाय पूर्णत्वास जाणार नाहीत. त्यामुळे जलसंपदा अभियंत्यांनी प्रत्यक्ष ‘फिल्ड’मध्ये उतरून ही कामे पूर्ण करावीत. जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी सांघिक भावनेने काम करणे आवश्यक आहे.
१५ जूनपूर्वी कामे करा
पाणीवापर संस्थांना चालना देण्याविषयी पालकमंत्री ठाकूर यांनी गतवर्षीच्या बैठकीतच आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर कार्यान्वित झालेल्या संस्थांची संख्या फारच थोडी असल्याने सर्व प्रकल्पांतर्गत समाविष्ट क्षेत्राचा आढावा घेऊन अपेक्षित कामे तत्काळ हाती घ्यावीत. पाटचाऱ्यांच्या कामांना गती देऊन पाणीवापर संस्थांना चालना द्यावी. १५ जूनपूर्वी किमान १०० ठिकाणी सिंचन सुरळीत होईल, हे उद्दिष्ट ठेवून कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या कामाचा आपण वेळोवेळी आढावा घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
बॉक्स
सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी पाठपुरावा
पाटचाऱ्यांची दुरुस्ती, निर्मिती आदी कामांसाठी आवश्यक निधी मिळवून देऊ. वासनी, गर्गा, पंढरी, निम्न चारघड, चंद्रभागा व आवश्यक त्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठीही पाठपुरावा केला जाईल. जिल्ह्यात पूर्ण झालेल्या प्रकल्पात एक मध्यम, ६८ लघु अशा ६९ प्रकल्पांचा समावेश आहे. बांधकामाधीन प्रकल्पात दोन मोठे, ८ मध्यम, २५ लघु प्रकल्प आहेत.