पर्यावरणपूरक उपक्रम : विद्यापीठाच्या रासायनिक तंत्रशास्त्र विभागाचा पुढाकार अमरावती : प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती प्रदूषणाला पूरक ठरत असल्याने त्याच्या वापरावर कोर्टाने लगाम लावल्यानंतरही त्याद्वारे निर्मित मूर्तींचा सर्रास वापर होत आहे. मात्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रासायनिक तंत्रशास्त्र (केमिकल टेक्नालॉजी) विभागातील विद्यार्थ्यांनी टाकाऊ कागदापासून मूर्ती साकारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या मूर्ती, साहित्य पर्यावरणपूरक असून ते स्वंयरोजगार देणारे आहे. प्लॉस्टर आॅफ पॅरिसपासून निर्माण होणाऱ्या मूर्ती, साहित्य हे पर्यावरणासाठी घातक असल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने प्लास्टर आॅफ पॅरिसपासून तयार करण्यात येणाऱ्या मूर्तींच्या वापरावर निर्बंध लावण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासनाला निर्देश देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने महापालिका, नगपरिषदांमध्ये प्लास्टर आॅफ पॅरिसद्वारे तयार होणाऱ्या मूर्तींचा वापर होता कामा नये, असे शासन आदेश निर्गमित झाले आहे. मात्र मूर्तिकारांकडे प्लास्टर आॅफ परिसद्वारे तयार होणाऱ्या मूर्तींचा वापर सर्रापणे होत आहे. परंतु विद्यापीठाच्या रासायनिक तंत्रशास्त्र विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक टाकाऊ कागदपासून मूर्ती तयार करण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे. टाकाऊ कागदापासून तयार होणाऱ्या मूर्ती स्वस्त आणि हाताळण्यास सुलभ आहेत. दोन ते पाच फुटांपर्यंत मूर्ती, साहित्य तयार करण्याची किमया विद्यार्थी करीत आहेत. आकर्षक तेवढ्याच सुबक मूर्ती साकारल्या जात आहेत. काच, लाकुड व अॅक्रालिकप्रमाणे टाकाऊ क़ागदापासून मूर्ती, साहित्य तयार करण्यात येत आहे. टाकाऊ कागदापासून तयार होणाऱ्या मूर्तींना आकर्षक व देखणी रंगरंगोटी करण्यात विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे. बाजारपेठेत विक्रीसाठी साहित्य, मूर्ती तयार होत नसून भविष्यात पर्यावरणाला होणारा धोका लक्षात घेता कागदापासून मूर्ती, साहित्य तयार करून त्यातून स्वयंरोजगार मिळविता येईल, असा संदेश विद्यापीठाचे रासायनिक तंत्रशास्त्र विभागप्रमुख आर. एस. सपकाळ यांनी समाजासमोर ठेवला आहे. (प्रतिनिधी) अशा तयार होतात कागदापासून मूर्ती, साहित्य ४संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रासायनिक तंत्रशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना टाकाऊ कागदापासून मूर्ती, साहित्य तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. यात टाकाऊ कागदाचे तुकडे पाण्यात भिजू घातले जातात. त्यानंतर 'हॅट्रोपलपर'मध्ये लगदा तयार केला जातो आणि लगद्यापासून वेगवेगळ्या साच्यात मूर्ती साकारली जाते. हल्ली दोन फुटांपर्यंत मूर्ती साकारण्याची किमया विद्यार्थ्यांनी अवगत केली असून येत्या काळात पाच फुटांपर्यंत मूर्ती तयार केल्या जाणार आहेत. टाकाऊ कागदापासून तयार होणाऱ्या मूर्ती, साहित्य हे पर्यावरणपूरक आहे. या मूर्ती पाण्यात विरघळून त्याचा पुनर्वापर करता येतो. भविष्याची मागणी लक्षात घेता टाकाऊ कागदापासून मूर्ती, साहित्य तयार करुन स्वयंरोजगार मिळविता येईल. - आर. एस. सपकाळ, विभागप्रमुख, रासायनिक तंत्रशास्त्र, अमरावती विद्यापीठ
टाकाऊ कागदापासून साकारतेय मूर्ती
By admin | Updated: July 13, 2016 01:21 IST