धारणी : सोमवारी बाजार उघडताच धारणीत गर्दीचा उच्चांक झाला. शहरातील मुख्य मार्ग अमरावती बरहानपूर, हनुमान चौक ते दयाराम चौकपर्यंत लोकांची तुफान गर्दी होती. त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी वाहने ठेवण्यात आल्यामुळे रस्ता जाम झाला होता. ही गर्दी कोरोनाचा संसर्ग वाढविणारी ठरली.
जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त अनेक दुकानदारांनी दुकाने थाटली. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्यावतीने त्या व्यापाऱ्यांवर भादंविचे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. बाजारासाठी जागा उपलब्ध असताना सुद्धा मेळघाट टॉकीज मार्गावर डॉ. रमीज यांच्या घरासमोर भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने लावण्यात आली होती. या दुकानात भाजीपाला खरेदी करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे.
मनियारी आणि बांगड्यांची दुकाने उघडली
बांगडी आणि मनयारी यांची दुकाने भाजी बाजारात जाण्यासाठी नगरपंचायतच्या बाजूला परवानगी नसताना अवैधरीत्या सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे या दुकानांवरसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गुजरी बाजारात नारळ, अगरबत्ती आणि इतर पूजेची सामग्री विक्रीची दुकाने सुरू होती. सध्या अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या लोकांकडून पूजेच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात उचल होत आहे. याच्या खरेदीसाठी सुद्धा गुजरी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आली.
बँकेसमोर गर्दी
दोन दिवस बँक बंद असल्यामुळे सोमवारी आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी जवळपास शंभर गावातील शेकडो लोकांनी भारतीय स्टेट बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र समोर एकच गर्दी केली होती . वारंवार सूचना देऊन सुद्धा लोक सामाजिक अंतराचे पालन करत नसल्याचे दिसून आले.